MLA Rohit Pawar : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे.
यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठ-मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रामुख्याने अहमदनगरमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागा काबीज करण्यासाठी सर्व पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत.
अशातच, मात्र अहमदनगर मधील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली आहे. बारामती ॲग्रो मध्ये काहीतरी अपहार असल्याच्या कारणावरून ईडी कडून रोहित पवारांची चौकशी सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर ईडीने रोहित पवारांना मुंबईला बोलावले होते. काल अर्थातच बुधवारी रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिलेत. दरम्यान रोहित पवार यांच्यावर होत असलेल्या या कारवाईमुळे त्यांचे समर्थक मोठे नाराज असून समर्थकांच्या माध्यमातून केंद्र शासन आणि राज्य शासनावर कटाक्ष साधला जात आहे.
फक्त आणि फक्त द्वेषापोटी ही चौकशी होत असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान ईडीच्या चौकशीसाठी निघताना आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेत. तसेच ते सुप्रिया सुळे यांच्या समवेत कार्यालयात गेलेत.
त्यांच्या समर्थनार्थ कर्जत-जामखेड मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते मुंबईत आले होते. आमचा दादा पळणारा नाहीतर लढणारा आहे’, ‘ज्याला साथ सह्याद्रीची त्याला भीती कोणाची’, ‘जहाँ तुम बुलाओगे वहा मैं आऊंगा’, ‘तुफान का वारीस हु, तबाह कर के जाऊंगा’, अशा आशयाचे फलक रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.
दरम्यान या साऱ्यांमध्ये नगरच्या राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा पाहायला मिळाली. खरेतर, कर्जत जामखेडचे वर्तमान आमदार रोहित पवार आणि भाजपाचे विधान परिषद आमदार तसेच कर्जत जामखेडचे माजी आमदार आमदार राम शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष कसा आहे याविषयी काही वेगळे सांगण्याची गरज नाही.
यामुळे रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असताना आमदार राम शिंदे नेमके कुठे होते ? ही चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात सुरु होती. आमदार राम शिंदे यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता ते मतदारसंघाच्या बाहेर नियोजित दैनंदिन कामासाठी असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र ते नेमके कुठे आहेत ? यावर त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे.