अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी ?

Tejas B Shelar
Published:

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. खरे तर आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अधिक रंगतदार बनण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसे खासच आहे.

लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे एकाच बाणातून दोन शिकार या हेतूने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी सुरू झाली असून लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी देखील चाचपणी केली जात आहे.

दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त चुरशीची बनणार अशी शक्यता तयार होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ या दोन जागा जिल्ह्यात येतात. या दोन्ही जागाबाबत विचार केला असता महायुतीमध्ये नगर दक्षिण भाजपाकडे आणि शिर्डी लोकसभा शिवसेना शिंदे गट यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही गोंधळ सुरू आहे. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शिर्डीच्या जागेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गदारोळ सुरू आहे. याशिवाय, महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर भाजपामध्ये वर्तमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे नाव आघाडीवर आहे. विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच शिर्डी लोकसभेच समीकरण पाहिलं तर महायुतीमधून वर्तमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव या शर्यतीत आहे. परंतु त्यांनाच उमेदवारी मिळणार का हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

महाविकास आघाडीकडून मात्र अजूनही या दोन्ही जागांसाठी कोणते उमेदवार उभे राहणार याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाहीये. महाविकास आघाडीमध्ये अहमदनगरसाठी उमेदवारांचा शॉर्टेज असल्याच्या चर्चा देखील पाहायला मिळत आहेत. वास्तविक नगर लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रात भाजपा खूपच कमकुवत असल्याचे भासते. परंतु लोकसभेचा विचार केला तर या जागेवर भाजपाचा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच बोलबाला आहे.

आधी दिलीप गांधी यांनी या जागेवर आपली मक्तेदारी कायम ठेवली होती. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपामध्ये आलेल्या सुजय विखे यांनी या जागेवरून लोकसभेच्या रिंगणात भाजपाकडून विजयी सलामी दिलेली आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीत हा भाजपाचा एक प्रकारे बालेकिल्ला बनला आहे. यामुळे महायुतीमधून ही जागा भाजपाकडेच राहणार हे जवळपास नक्की आहे.

मात्र या जागेसाठी भाजपामधून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. आमदार राम शिंदे, भानुदास बेरड यांची नावे चर्चेत आली आहेत. पण, महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे देखील नाव या जागेसाठी चर्चेत आहे. यामुळे या जागेवरून महायुतीकडून कोणता उमेदवार फायनल होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तूर्तास मात्र सर्व समीकरण एका गुलदस्त्यात आहे.

जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हाच महायुतीचा गुलदस्ता ओपन होईल असे भासत आहे. महाविकास आघाडीमध्ये पवार कुटुंबातून आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, आमदार शंकरराव गडाख यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र यापैकी प्रताप ढाकणे यांनीच फक्त लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलून दाखवल आहे.

उर्वरित आमदारांनी लोकसभेसाठी उत्सुकता दाखवलेली नाही. शिर्डीच्या जागेसाठी उबाठा शिवसेनाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देऊ शकते असे बोलले जात आहे. मात्र या जागेवर काँग्रेसने देखील दावेदारी ठोकली आहे. यामुळे तीन तिघाडा आणि काम बिघाडा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे देखील समीकरण पुढे येऊ लागले आहे.

याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असे चित्र तयार होत आहे. असे झाल्यास सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होईल आणि यामुळे पवार कुटुंबातील गृहकलह जगजाहीर होणार आहे.

यामुळे असे होऊ नये यासाठी सुप्रिया सुळे यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी दिली जाऊ शकते असे नवीन समीकरण आता पुढे येऊ लागले आहे. तथापि या साऱ्या गोष्टी अजूनही फक्त चर्चेतल्या आहेत. जिल्ह्यातील लोकसभेच्या या दोन जागांसाठी महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून नेमके कोणते उमेदवार फायनल होतील हे सारे गुलदस्त्यातच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe