राजकारणात आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत, पण संगमनेरमध्ये पाणी प्रश्नावरून खडाजंगी सुरु झाली आहे. आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “स्वतःला जलनायक म्हणवता, मग तालुका तहानलेला का?” असा थेट सवाल केला.
पराभवानंतर खरे बोलण्याची वेळ आली – खताळ
माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाणी आणि वीजेच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, “पराभवानंतर का होईना, आता तरी कार्यकर्त्यांपुढे खरे बोलण्याची वेळ आली आहे.” महायुती सरकार आल्यावर शंभर दिवसांतच थोरातांना तालुक्यात पाणीटंचाई आहे, याची जाणीव झाली का? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला.

45 वर्षांच्या सत्तेत पाणीप्रश्न सुटला नाही, आम्ही सोडवू
“तुम्ही तब्बल 45 वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले. राज्यातील अनेक सत्तास्थाने तुमच्या ताब्यात होती, तरीही तुम्ही तालुक्यातील भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवू शकला नाहीत.” असे सांगत तालुका जाणूनबुजून तहानलेला ठेवला गेला, असा गंभीर आरोप खताळ यांनी केला.
त्याचबरोबर, “महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार आहोत, जेणेकरून पठार भागातील पाणीप्रश्न सोडवला जाईल.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वीजेच्या समस्येवर तोडगा, महायुती सरकारचे सहकार्य
वीजेच्या प्रश्नावरही उत्तर देताना खताळ म्हणाले की, “शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि लूट पूर्णपणे थांबवण्यात आम्हाला शंभर दिवसांत यश आले आहे.” मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नादुरुस्त रोहित्र दोन दिवसांत बसवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वाचले आहे.
तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील विजेच्या समस्यांवर सखोल चर्चा झाली असून, महायुती सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे.
“तालुक्यातील जनता दूधखुळी नाही” – खताळ
माजी आमदारांकडे आता कोणतेही मुद्दे नसल्याने स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांनी मुद्दाम पाणी आणि वीजेच्या प्रश्नांवर टीका सुरू केली आहे, असा आरोपही आमदार खताळ यांनी केला.
“तालुक्यातील जनता एवढी दूधखुळी नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. जनतेच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या आमदारावर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या अपयशाकडे पाहण्याची गरज आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी थोरात यांना लगावला.