खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…

Sushant Kulkarni
Published:

१६ जानेवारी २०२५ पुणे : परभणी असो किंवा बीडमधील हत्या प्रकरणात मी कधीही राजकारण केले नाही.विविध समाज माध्यमे आणि इतर ठिकाणांहून उपलब्ध माहितीनुसार, बीड मध्ये मे महिन्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गंभीर विषय पुढे येत असताना ईडीचा हस्तक्षेप अजून का झाला नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.

पुणे महापालिकेतील विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यासाठी खासदास सुळे पुण्यात आल्या होत्या.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यातील खुनी अजूनही पोलिसांना सापडत नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.

त्याचबरोबर बीडमध्ये जमावबंदी असताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आंदोलने होत असतील, तर गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही ईडीचा हस्तक्षेप होत नाही.

हीच बाब आमच्या पक्षातील नेत्यांवरील कारवाईबाबत का झाली नाही ? अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्याबाबत ईडीने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई केली.मात्र बीडच्या प्रकरणात असे होताना दिसत नाही.विष्णू चाटेचा डीसीआर अजूनही उपलब्ध होत नसल्याने गृहखात्याबाबत शंका येत असल्याने तातडीने आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

त्या’ शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

वाल्मिक कराडकडून बारामतीमधील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत.याबाबत मी बारामतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे.याबाबत कोणी डोळेझाक केली,तरी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची माहिती देणार आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe