सप्टेंबरमध्ये केंद्रात होणार मोठा बदल? मोदींच्या नागपूर भेटीवर रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Published on -

अहिल्यानगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभाग घेतला.

त्यांच्या या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. मोदींचा हा दौरा केवळ व्यक्तिगत कार्यक्रम नव्हता, तर त्यामागे काही महत्त्वाचे राजकीय गणित असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच संघाच्या कार्यक्रमाला आले असतील. या दौऱ्यामुळे सप्टेंबरमध्ये केंद्र पातळीवर काही मोठे निर्णय होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून मोठा बदल केला जाईल का, किंवा संघाच्याही भूमिकेत काही बदल होईल का, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात मोठा निर्णय सुचवला. त्यांनी स्पष्ट केलं की, आता पक्षाची जबाबदारी हळूहळू युवा पिढीकडे सोपवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने त्यांनी युवा नेतृत्वाची प्रशंसा केली आणि संघटनात्मक बदलाचे संकेत दिले.

यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शरद पवार युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्यास युवा पिढी उत्तम कामगिरी करेल. विविध क्षेत्रांतील तरुणांना एकत्र घेऊन संघटनात्मक काम करण्याचा पक्षाचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे रोहित पवार यांना नव्या जबाबदारीसाठी तयार केलं जात आहे का, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

कर्जतमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाने केले होते.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोलापूरचा वेताळ शेळके 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला. रोहित पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन अत्यंत पारदर्शक असल्याचे सांगितले आणि खेळाडू वृत्तीचे कौतुक केले.

वेताळ शेळकेने उपविजेता पृथ्वीराज पाटीलला खांद्यावर उचलून घेत त्याचा सन्मान केला. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या इतर कुस्ती स्पर्धांमध्ये झालेल्या वादांवर टीका केली.

काही ठिकाणी स्पर्धेबाबत टीका होते, पण अशा खेळाडू वृत्तीने स्पर्धा पार पडाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe