क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्याचाच परिणाम महिला आता प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण क्रीडा, उद्योग-व्यवसाय, उद्योजकता अशा सर्वत्रच महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सह्याद्री महाविद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया, जयहिंद महिला मंच , संग्राम पतसंस्था आणि सह्याद्री महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “आर्थिक साक्षरता” या विषयावर विशेष व्याख्यान व लोक्शास्र सावित्री या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ. डाॅ.सुधीर तांबे, युनियन बॅकेचे अधिकारी मनीष कुमार, सौ. कांचनताई थोरात, मा. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, शर्मिला देशमुख, सौ. शरयुताई देशमुख, डॉ सोमनाथ मुटकुळे, नामदेव गुजाळ, हिरालाल पगडाल, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन जोशी, राणीप्रसाद मुंदडा, मंजुळ भारद्वाज, प्रमिला अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले कि, महिला दिनाचे व सौ कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकशास्त्र सावित्री हे नाटक आयोजित केले आहेत. महिलांनी काटकसरीने जमा केलेले धन अडचणीच्या काळात कुटुंबाच्या मदतीला येते. आज महिला पुरुषांबरोबर सर्व क्षेत्रात नेत्र दीपक प्रगती साधत आहे. आजच्या काळात महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून खूप त्रास, कष्ट सहन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी खूप मदत केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी सर्व जाती धर्मातील स्त्रियांना समानता देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांनी स्त्रियांना सन्मानाची आदराची वागणूक दिली असल्याचेही हे म्हणाले.
यावेळी मा डॉ तांबे म्हणाले कि, लोकशास्त्र सावित्री हे सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आधारित नाटक आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला या आर्थिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. धावपळीमुळे महिलांचे आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिला सुदृढ असल्या तर कुटुंब सुद्धा होईल. महिला या समाजात पुढे चालल्या असून त्या समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी कृती कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे ते म्हणाले.
सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, महिलांना आर्थिक साक्षरता समजावी, त्यांना काटकसर आणि पैशाचे नियोजन कसे करावे, एसआयपी कशी करावी याची माहिती होण्यासाठी आर्थिक साक्षरता या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 वर्षापासून शहरात आणि तालुक्यात बचत गटाचे काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.यावेळी युनियन बॅकेचे अधिकारी मनीष कुमार, शर्मिला देशमुख यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.