Mhada Lottery : पुणेकरांसाठी घर खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गत काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये घराच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पुण्यातही घरांच्या किमती सतत वाढत आहेत.
यामुळे सर्व सामान्यांना घर खरेदी करायची असल्यास ते म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान पुणे म्हाडा मंडळाने यंदा तब्बल 6168 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे यातील 1982 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अर्थात जे पात्र अर्जदार पहिले अर्ज करतील त्यांना या लॉटरीत घर उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे ज्यांना या लॉटरीत घर खरेदी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. लॉटरीसाठी अर्ज करताना अर्जदाराने ठरावीक अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
ही रक्कम उत्पन्न गटानुसार वेगवेगळी आहे. तसेच, अर्जासोबत 600 रुपये अर्ज शुल्क आणि त्यावर 18 टक्के जीएसटी म्हणजेच 107 रुपये आकारले जाणार आहेत.
ही 708 रुपयांची फी विना परतावा राहणार आहे. अर्थात अर्जासाठी घेतलेली फी परत मिळणार नाही. पण घर मिळाले नाही तर अनामत रक्कम अर्जदाराला परत दिली जाईल.
अनामत रक्कम किती भरावी लागणार ?
अल्प उत्पन्न गट : 10 हजार + 708
अत्यल्प उत्पन्न गट : 20 हजार + 708
मध्यम उत्पन्न गट : 30 हजार+ 708
उच्च उत्पन्न गट : 40 हजार + 708
या घरांसाठी अर्ज MHADA ची अधिकृत वेबसाईट तसेच MHADA Lottery अॅप यांच्या माध्यमातून करता येणार आहे. घरांच्या किमती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अटी-शर्ती याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
तसेच, अधिकृत जाहिरात पीडीएफ सुद्धा डाउनलोड करता येईल. म्हाडाच्या या योजनेतून पुणेकरांना परवडणाऱ्या दरात घर खरेदीची संधी मिळणार आहे.
मागील काही वर्षांत वाढलेल्या घरांच्या किमतींमुळे सामान्य कुटुंबाला घर परवडणं कठीण झालं होतं. त्यामुळे म्हाडाची ही लॉटरी घर शोधणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे.