Mhada News : मुंबईत आपले एक हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. पण मुंबईतील घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांना मायानगरीत घर बनवणे अवघड होत आहे. यामुळे अनेक जण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान म्हाडाने यावर्षी दिवाळीत हजारो घरांसाठी लॉटरी काढली जाईल अशी घोषणा केली होती. यामुळे लाखो लोक या लॉटरीची वाट पाहत होते. पण आता मुंबईकरांचे घर खरेदीचे स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची बातमी समोर आली आहे.

म्हाडा मुंबई मंडळाने चालू वित्त वर्षात हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार अशी घोषणा केली होती. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आता ही लॉटरी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेची संभाव्य आचारसंहिता आणि काही प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा मुंबई मंडळाकडून दिवाळीत लॉटरी काढली जाणार नसल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष संदीप जयस्वाल यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. यामुळे असंख्य मुंबईकरांचे स्वप्न भंगले आहे. उपाध्यक्ष संदीप जयस्वाल यांनी म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी पुढील वर्षी जाहीर केली जाणार अशी माहिती दिली आहे.
मार्च 2026 पर्यंत मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार असून तोपर्यंत सर्वसामान्य मुंबईकरांना वाट पहावी लागणार आहे. खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबत अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वाचा निकाल समोर आला आहे.
जानेवारी महिन्यापर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. अर्थातच मुंबई महापालिकेची निवडणूक देखील लवकरच संपन्न होणार आहे.
दरम्यान याच महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता कोणताही नवा उपक्रम जाहीर करता येत नाही. यामुळे म्हाडाच्या लॉटरीसाठी मुंबईकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
या निर्णयामुळे स्वस्तात म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला असल्याचे चित्र आहे. परंतु मार्च 2026 पर्यंत लॉटरी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. स्वतः उपाध्यक्षांनीच पुढील वर्षी मार्च महिन्यात लॉटरी जाहीर होणार असल्याचे सुतोवाच केले आहे.