पुण्यात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ! म्हाडा कडून 4186 घरांसाठी लॉटरी जाहीर, वाचा सविस्तर

Mhada News : तुमचेही पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आहे का मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. अलीकडे या शहरात मोठ्या आयटी कंपन्यांनी आपल्या बस स्थान बसवले आहे. यामुळे उद्योग, रोजगार, शिक्षण निमित्ताने पुण्यात स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अनेकांचे या शहरात आपले हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. पण इथेही घरांच्या किमती मुंबई सारख्याच वाढत आहेत. अलीकडेच एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये पुण्यातील घरांची मागणी घटलेली असतानाही किमतीत 14 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले.

पुण्यातील घरांच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंब घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या घरांवर अवलंबून आहे. दरम्यान आता म्हाडाच्या पुणे मंडळांने चार हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

पुणे मंडळाकडून 4186 घरांसाठी नुकतीच लॉटरी जाहीर करण्यात आली असून यासाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या लॉटरीमध्ये पीएम आवास योजनेची 219 घरे, म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पातील 1683, तसेच सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पातील 864 घरे समाविष्ट आहेत.

या लॉटरीतील 3322 घरे 20 टक्के सर्वसमावेशक गृह योजनेतील आहेत. अशा स्थितीत आता आपण या लॉटरीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. या घरांसाठी इच्छुक उमेदवारांना आजपासून अर्ज सादर करता येणार आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी देखील 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे. पण जे इच्छुक उमेदवार आरटीजीएस / एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरणार आहेत त्यांना एक नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या सोडतीसाठी सादर केलेल्या अर्जदारांपैकी पात्र अर्जदारांची यादी 17 नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या लॉटरीची संगणकीय सोडत 21 नोव्हेंबर रोजी निघणार अशी माहिती पुणे मंडळाकडून समोर आली आहे.

या लॉटरीमुळे हजारो नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यामुळे इच्छुकांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अनामत रक्कम देखील दिलेल्या मुदतीत भरावी असे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे.