Mhada Lottery 2025 : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. म्हाडा लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नुकतीच कोकण मंडळाने 2147 सदनिका आणि 110 भूखंडांसाठी लॉटरी काढली होती, ज्या लॉटरीसाठी तब्बल 24,911 अर्ज प्राप्त झाले होते. या लॉटरीत अनेक जण अपयशी ठरले, मात्र आता नवीन संधी उपलब्ध होत आहे.
चितळसर येथे 1173 घरांसह नवीन योजनांचा समावेश
म्हाडाच्या कोकण मंडळाने नव्या घरांची योजना आणली असून यात चितळसर परिसरातील 1173 घरांचा समावेश असणार आहे. या भागातील घरे मोठ्या संख्येने उपलब्ध होणार असल्यामुळे अनेक नागरिकांना घर मिळण्याची संधी वाढणार आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घरांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे अधिक लोकांना या योजनेचा लाभ होऊ शकतो.

म्हाडा दरवर्षी 30 हजार घरांची लॉटरी काढणार
म्हाडाच्या नियोजनानुसार दरवर्षी राज्यात सुमारे 30 हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. प्रत्येक तीन ते सहा महिन्यांत वेगवेगळ्या मंडळांमार्फत सोडतीचे आयोजन करण्याची तयारी आहे. गेल्या दीड वर्षांत म्हाडा कोकण मंडळाने तीन सोडती जाहीर केल्या असून सुमारे 10,000 लोकांना घर मिळाले आहे. आता पुन्हा 2,000 घरांची लॉटरी जाहीर करण्यात येणार असून त्यात चितळसर परिसरातील 1173 घरांसह, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या घरांचा समावेश असेल.
ठाणे पालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे सोडत रखडली
चितळसर येथे म्हाडाने 22 मजल्यांच्या 7 इमारती बांधल्या आहेत, मात्र या परिसराला पाणी आणि रस्त्याची समस्या असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिलेले नाही. हे प्रमाणपत्र मिळताच ही घरे लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातील आणि अधिक लोकांना याचा लाभ होईल. प्रशासन आणि म्हाडा यावर काम करत असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.