सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाची मुंबईतील घरे स्वस्त होणार, येत्या आठवड्यात नवीन धोरणाला मंजुरी

Published on -

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. पण अलीकडे म्हाडाच्या घरांच्या किमती सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

मुंबईसारख्या शहरांमध्ये तर म्हाडाची घरे सुद्धा विक्री विना पडून आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे आधी म्हाडाच्या घरांना मोठा प्रतिसाद मिळायचा मात्र आता हा प्रतिसाद कमी झाला आहे.

दरम्यान म्हाडाकडून सर्वसामान्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा म्हणून जीएसटी च्या रेट मध्ये कपात केली आहे.

सरकारने अनेक अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे. काही वस्तूंवरील जीएसटी थेट शून्य करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान आता म्हाडा देखील आपल्या घरांच्या किमती कमी करणार आहे.

मागील काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही घरे सर्वसामान्य लोकांना परवडेनाशी झाली होती. त्यामुळे लोकांनी म्हाडाच्या सोडतीकडे अक्षरशः पाठ फिरवली होती.

पण, आता म्हाडाच्या नव्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांतील घरांच्या किमती कमी होणार आहेत. प्राधिकरणाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत स्वस्त होतील असा अंदाज आहे.

खरेतर, घरांच्या किंमती निश्चित करण्यासाठी म्हाडाने एका समितीची स्थापना केली होती. आता ही समिती आठवडाभराच्या आत उपाध्यक्षांकडे आपला अहवाल सादर करणार आहे.

त्यास मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. घरांच्या किमती कमी झाल्यास अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील काही सोडतींमध्ये वाढीव किमतीमुळे अनेक विजेते घर परवडत नसल्याने ते परत करत होते. तर उच्च गटातील कोट्यवधींची घरे विक्रीअभावी रिक्त पडली होती. ताडदेव येथील साडेसात कोटींच्या सात घरांना दोन सोडतीनंतरही प्रतिसाद मिळालेला नाही.

त्यामुळे म्हाडाच्या किंमत धोरणावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी याच पार्श्वभूमीवर समिती स्थापन करून सर्वसामान्यांच्या आवाक्यातील किंमती ठरविण्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती. समितीने दीर्घ अभ्यासानंतर नवीन धोरण तयार केले आहे.

आतापर्यंत किंमतीत 5 टक्के प्रशासकीय खर्चासह काही अतिरिक्त खर्च जोडला जात होता. त्यामुळे किंमती अनावश्यकरीत्या वाढत होत्या. पण प्राधिकरणाच्या नव्या धोरणानुसार प्रत्यक्षात झालेला बांधकाम खर्च आणि संबंधित खर्चच फक्त समाविष्ट केला जाणार आहे.

तसेच, वस्तू व सेवा कररचनेतील बदलांमुळे सिमेंट, स्टीलसह बांधकाम साहित्य स्वस्त होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम म्हाडाच्या घरांच्या किंमतीवर होईल. त्यामुळे पुढील सोडतींमध्ये घरे तुलनेने स्वस्त मिळणार असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News