Investment In Property After Retirement:- गेल्या काही वर्षापासून रियल इस्टेट म्हणजेच मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा खूप चांगला मानला जातो.
परंतु याचे जर आपण काही पॅरामिटर बघितले तर आयुष्याच्या एका उतार वयात किंवा निवृत्तीनंतर प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवणे सर्वांसाठीच फायद्याचे ठरेल असे मात्र होत नाही.

त्यामुळे योग्य कालावधीत मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असते व त्या अगोदर चांगला विचार करूनच निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने या लेखात आपण निवृत्तीनंतर म्हणजेच रिटायरमेंट नंतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी तसेच त्याचे फायदे व तोटे समजून घेणार आहोत.
निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे
1- नियमित उत्पन्न- निवृत्तीनंतर मालमत्ता खरेदी करण्याचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणे हा होय. तुम्ही जर घर किंवा एखादी व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली व ती जर भाड्याने दिली तर भाड्याच्या स्वरूपात तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकते.
2- मालमत्तेच्या किमतीत झालेली वाढ- आपल्याला माहित आहे की प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत असते. त्यामुळे तुम्ही रिटायरमेंट नंतर जर मालमत्तेत पैसे गुंतवले आणि मालमत्ता खरेदी केली तर काही वर्षांनी त्या मालमत्तेच्या किमतीत वाढ होणारच आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये अशी मालमत्ता विकून चांगला नफा या माध्यमातून कमवू शकतात.
3- सुरक्षित गुंतवणूक- जर आपण गुंतवणुकीचे इतर पर्याय बघितले तर त्यापेक्षा मालमत्तेत केलेली गुंतवणूक ही सर्वात जास्त सुरक्षित समजली जाते. साधारणपणे मालमत्तेमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे काही नुकसान होण्याची शक्यता कमीत कमी असते. फक्त अशा प्रकारची प्रॉपर्टी किंवा मालमत्ता खरेदी करणे अगोदर काही गोष्टींची काळजी घेणे व माहिती घेणे गरजेचे असते.
4- भाडे देण्याची गरज नाही– स्वतःची जर प्रॉपर्टी असेल तर दर महिन्याला भाडे भरण्याची आवश्यकता भासत नाही. नाहीतर भाड्याने जर घरात राहायची वेळ आली तर घर मालकाच्या भाडेवाढीचा सामना आपल्याला करावा लागतो. परंतु त्या तुलनेत मात्र स्वतःच्या प्रॉपर्टीत भाडे भरण्याची गरज भासत नाही.
5- कुटुंबाला एक आधार- निवृत्तीनंतर जर एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर भविष्यामध्ये कुटुंबासाठी ही प्रॉपर्टी एक आर्थिकदृष्ट्या चांगला आधार बनू शकते. कारण तुमच्या नंतर तुमच्या मुलांना ती वारसा हक्काने प्राप्त होते व त्यांना तो एक खूप मोठा आधार बनू शकतो.
निवृत्तीनंतर प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचे तोटे
1- अनावश्यक गुंतवणूक- तुम्हाला फक्त गुंतवणूक करायची आहे तर त्याकरिता प्रॉपर्टी खरेदी करणे तोट्याचे ठरू शकते. त्या ऐवजी तुम्ही जर म्युच्युअल फंड तसेच स्टॉक्स, विविध पेन्शन योजना इत्यादीमध्ये गुंतवणूक केली तर ते फायद्याचे ठरते. कारण मालमत्तेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत या पर्यायांमध्ये तुम्हाला कमीत कमी रकमेत देखील गुंतवणूक करता येते.
2- अनावश्यक खर्च- कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केली तर त्याच्या देखभालीवर तुम्हाला काही खर्च करावाच लागतो. अशावेळी तुम्हाला त्या प्रॉपर्टी पासून जर काही उत्पन्न मिळत नसेल तर मात्र तुमच्यावर आर्थिक भार येऊ शकतो. मालमत्तेपोटी तुम्हाला कर तसेच विमा, देखभाल आणि दुरुस्तीचा अतिरिक्त खर्चाचा भार पडतो.
3- विक्री करता येत नाही- समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला अचानकपणे पैशांची गरज भासली तर तुम्ही पटकन मालमत्तेची विक्री करू शकत नाहीत.त्या तुलनेमध्ये जर तुम्ही स्टॉक्स किंवा सोने सारख्या इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर पैशांच्या गरजे वेळी तुम्ही विक्री करून पैसा उभा करू शकतात.
निवृत्तीनंतर जर तुम्हाला मालमत्तेत गुंतवणूक करायची तर या गोष्टी लक्षात घ्या
1- गुंतवणुकी आधी आर्थिक स्थिती व उत्पन्न लक्षात घ्यावे- घर वा फ्लॅट खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे सर्वात आधी गुंतवणूक करताना आर्थिक स्थिती व उत्पन्न किती आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
तुम्ही जर प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या उद्देशाने अनेक वर्षांपासून बचत केलेली असल्यास त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय तुमचा फायद्याचा ठरू शकतो.
2- खरेदीचा उद्देश पाहणे- तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर मालमत्ता का खरेदी करत आहात? याचा सगळ्यात अगोदर विचार करायला हवा. मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला नेहमीच उत्पन्न सुरू करायचे आहे की केवळ गुंतवणूक हा उद्देश आहे? हे देखील तुम्ही ठरवावे.
तुम्ही जर नियमित उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर हा एक चांगला निर्णय आहे. फक्त गुंतवणूक करायची असेल तर मात्र इतर चांगले पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असून त्यामध्ये गुंतवणूक करावी.
3- तुमच्या नंतर प्रॉपर्टीचे काय? याचा विचार करावा- वयाची 60/70 नंतर प्रॉपर्टीतील गुंतवणूक एखाद्या वेळी जोखमीची ठरू शकते. या कालावधीमध्ये तुमचे उत्पन्न थांबलेले असते व आरोग्य सेवांवर तुम्हाला बराच खर्च देखील करावा लागू शकतो. तसेच तुमच्या मालमत्तेची मालकी नेमकी कुणाकडे असेल? याबाबत देखील विचार करणे गरजेचे आहे.