7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुधारित करण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला. मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला आणि यानुसार या संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 55% एवढा झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली आहे.
दरम्यान केंद्रातील सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जात आहे.
कोणकोणत्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ?
आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित करण्यात आला आहे. या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एप्रिल महिन्यात सुधारित करण्यात आला असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे मध्यप्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः ही घोषणा केली आणि या घोषणेनंतर आता याबाबतचा शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला.
राज्य कर्मचाऱ्यांचा DA किती वाढला?
काल अर्थातच आठ मे 2025 रोजी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या घोषणेनंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% करण्याबाबतचा शासन निर्णय तेथील वित्त विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना फक्त 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता थेट 55% करण्यात आला आहे. म्हणजे यामध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.
जुलै 2024 पासून तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे आणि जानेवारी 2025 पासून दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा जानेवारी महिन्यापासून सुधारित करण्यात आला असल्याने महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांकडूनही याबाबत प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार?
आतापर्यंत देशभरातील विविध राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला गेला पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुद्धा केला जात आहे. सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच 55% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांनी होईल अशी आशा आहे.
जून ते जुलै 2025 या कालावधीत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. परंतु या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
पण महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधीही झाला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू राहील यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे.