7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक नवीन अपडेट हाती आली आहे. हे अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात.
सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. याआधी हा भत्ता 53% इतका होता म्हणजेच मार्च महिन्यात महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याचा लाभ जानेवारी 2025 पासून मिळतोय.
दरम्यान आता जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार असून याची अधिकृत घोषणा रक्षाबंधनानंतर होईल अशी माहिती देखील समोर आली आहे.
तर काही मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की साधारणता दसऱ्याच्या किंवा दिवाळीच्या सुमारास याबाबतचा अधिकृत निर्णय होईल.
महागाई भत्ता वाढीची आकडेवारी काय सांगते
महागाई भत्ता एआयसीपीआयच्या अधिकृत आकडेवारीनुसार वाढवला जातो. म्हणजे जानेवारी ते जून 2025 या कालावधीमध्ये AICPI च्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान कामगार मंत्रालयच्या आतापर्यंतच्या एआयसीपीआय निर्देशांकाकडे पाहिले तर यावेळी डीए 2 ते 3 टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. पण अजूनही मे आणि जून या दोन महिन्यांची आकडेवारी येणे बाकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 30 जून रोजी मे ची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जानेवारी ते एप्रिल या कालावधी मधील एआयसीपीआय इंडेक्स बघितले तर जानेवारी 2025 मध्ये हे निर्देशांक 143.2, फेब्रुवारी महिन्यात एआयसीपीआय-आयडब्ल्यू निर्देशांक 142.8, मार्चमध्ये 143.0 आणि एप्रिलमध्ये 0.5 गुणांनी वाढून 143.5 पर्यंत पोहोचले आहेत.
तसेच डीए स्कोअर 57.95 % पर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, या चार महिन्यांच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 2 ते 3 % नी वाढू शकतो असे संकेत मिळत आहेत. मात्र मे आणि जून या दोन महिन्यांची आकडेवारी समोर आल्यानंतरच डीए किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
किती वाढणार DA?
एआयसीपीआयची आकडेवारी मे महिन्यात पण वाढत राहिली आणि जून महिन्यात पण यामध्ये सुधारणा झाली तर जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता मिळतोय आणि यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर हा भत्ता 58% वर पोहोचणार आहे. यामुळे साहजिकच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुद्धा मोठी वाढ होणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे, यामुळे जुलै 2025 पासूनची महागाई भत्ता वाढ ही सातवा वेतन आयोगाची शेवटची महागाई भत्ता वाढ सुद्धा ठरू शकते.