7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी अधिक खास राहणार आहे.
केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकार लवकरच जुलै ते डिसेंबर या कालावधीतील महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा करू शकते.

सध्या कर्मचाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मात्र, यावेळी ३ टक्क्यांनी वाढ होऊन तो ५८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी दोनदा – जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर – या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
यावेळी सरकारच्या घोषणेची प्रतीक्षा लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना लागली आहे. मार्च महिन्यात सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता. तसेच ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली.
आता दिवाळीच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. पुढील ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८% करण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते.
याचा निर्णय पुढील महिन्यात होत असला तरी देखील ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. अर्थात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
पगारात किती वाढ होणार?
१८,००० रुपये बेसिक पगार असणाऱ्याला ५५ टक्के दराने ९,९०० रुपये DA मिळतो. पण महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत गेला तर महागाई भत्ता १०,४४० रुपये होणार आहे.
अर्थात कर्मचाऱ्यांच्या पगारात ५४० रुपयांची वाढ होईल. त्याचवेळी ९,००० रुपये पेन्शन असणाऱ्याला ५५ टक्के दराने ४,९५० रुपये महागाई भत्ता मिळतोय.
पण DA ३ टक्क्यांनी वाढला की भत्ता ५,२२० रुपयांवर जाणार आहे. ९००० रुपये पेन्शनवाल्याला महिन्याला २७० रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे.