7th Pay Commission : शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबरचा महिना मोठा खास ठरणार आहे. सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा पगार वाढणार आहेत. त्यामुळे या नोकरदार मंडळीला दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेसहित सरकारी कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात भरडले जात आहेत. महिन्याकाठी येणारा पगार हा घरखर्चात निघून जातो.

दरम्यान याच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्येक सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो. महागाई भत्त्यात वाढ केली जाते अन यामुळे या मंडळीचा पगार वाढतो.
मार्च 2024 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली होती. त्यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय.
दरम्यान आता या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. जुलै 2024 पासून ही वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे वृत्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आले होते.
किती वाढणार महागाई भत्ता
सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता कितीने वाढवायचा हे एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते. जानेवारी महिन्यापासून जो महागाई भत्ता वाढला तो जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारी लक्षात घेऊन वाढवला गेला होता.
आता जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीमधील एलआयसीपीआयची आकडेवारी लक्षात घेऊन जुलै 2024 पासून चा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला जाण्याची शक्यता आहे. तथापि याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्रातील सरकार घेणार आहे.
कधी होणार निर्णय ?
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याबाबतच्या फाईलवर केंद्रातील सरकार सही करणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे.