7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुराळा सुरु आहे. पण आता निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यानंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजेच 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये जोरदार काटे की टक्कर दिसत आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणाचे सरकार येणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

मात्र महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असल्याने आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे.
खरंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून आचारसंहिता कालावधीतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. आचारसंहिता महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी अडसर ठरत नाही असे म्हणत राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून लवकरात लवकर डीए वाढीची मागणी करण्यात आली.
मात्र, सरकारकडून याबाबतचा निर्णय घेतला गेला नाही. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला नाही. पण महाराष्ट्रात निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्ता स्थापित करणार ते नवीन सरकार सत्ता स्थापित केल्यानंतर लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेणार आहे.
डिसेंबर महिन्यात याबाबत नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त केली जात आहे. सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता लागू आहे.
मात्र आता हा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
अर्थातच डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू राहणार आहे.
यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. यामुळे डिसेंबर महिना राज्य कर्मचाऱ्यांसाठी खास ठरेल आणि नवीन वर्षाच्या सुरुवातील राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात मोठी वाढ पाहायला मिळेल असे दिसत आहे.