7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातचं 24 ऑगस्टला केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) जाहीर केली आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेची मागणी करत आहेत. निवृत्तीनंतर पेन्शनची हमी असावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केली जात होती.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून त्याऐवजी जुन्या पेन्शन स्कीमचा लाभ दिला पाहिजे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच मागणीवर आता सकारात्मक निर्णय झाला आहे.
नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता UPS चा लाभ मिळणार आहे. यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ फक्त अशाच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे की सध्याच्या नवीन पेन्शन सिस्टमचा (NPS) भाग आहेत.
याचा लाभ निवृत्त एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजना वरून यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये स्वीच करावे की नाही याबाबत जाणून घेणार आहोत.
UPS स्वीकारावे की नाही
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एनपीएसवरून यूपीएसवर जावे की नाही, हे कर्मचाऱ्यांच्या उद्दिष्टांवर अवलंबून असेल. काही कर्मचारी शेअर बाजाराप्रमाणेच परताव्याची अपेक्षा करू शकतात, तर काही निश्चित पेन्शनला प्राधान्य देऊ शकतात.
तज्ञ म्हणतात की, जर तुमचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर भरोसा असेल, पुढेही आपल्या देशाची ग्रोथ अशीच होणार असा तुमचा विश्वास असेल आणि तुमच्या निवृत्तीला बरीच वर्षे शिल्लक असतील, तर एनपीएसमध्ये राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
जर तुम्हाला माहिती असेल की, शेअर बाजार कसे काम करते आणि तुमच्या निवृत्तीसाठी किमान 10-20 वर्षे शिल्लक असतील तर NPS मधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना गॅरंटेड पेन्शन हवी असेल त्यांनी UPS मध्ये स्विच करण्यास काही हरकत नाही.
यूपीएसमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के एवढी पेन्शन मिळणार आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी रक्कम असू शकते.
काही तज्ञ म्हणतात की, NPS सदस्य UPS वर स्विच करण्याचा विचार करू शकतात, कारण यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जीवनशैलीला आधार देण्यासाठी पुरेसे पेन्शन मिळत राहील.