8th Pay Commission : गेल्या वर्षी केंद्रातील सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि यासाठी तीन सदस्य समितीची स्थापना केली. तेव्हापासून नव्या आयोगाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
याच नव्या आयोगाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आल आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आयोगातून मोठे सरप्राईज मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नव्या आयोगातून आत्तापर्यंतची सर्वाधिक पगार वाढ मंजूर होण्याची दाट शक्यता आता चर्चेला आली आहे. पण आम्ही असं का म्हणतोय, नेमके पडद्यामागे काय घडत आहे, नव्या आयोगाबाबतचे आत्तापर्यंतच्या हालचाली कशा आहेत याच बाबतची सविस्तर माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.
मंडळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता वेग आला असून, 8 व्या वेतन आयोगासंदर्भात एक महत्त्वाची आणि आशादायक माहिती समोर आली आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन (FNPO) ने मांडलेल्या प्रस्तावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.
आतापर्यंत फिटमेंट फॅक्टर 2.5 ते 3.0 दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र एफएनपीओने थेट 3.25 फिटमेंट फॅक्टरची शिफारस केल्याने पगारवाढीचं संपूर्ण गणितच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ कल्पनेत असलेली मोठी आर्थिक दिलासा मिळू शकतो.
60 पानांच्या प्रस्तावात काय आहे?
एफएनपीओचे सरचिटणीस आणि एनसीजेसीएमचे सदस्य शिवाजी वासिरेड्डी यांनी नॅशनल कौन्सिल (JCM) कडे तब्बल 60 पानांचं सविस्तर निवेदन सादर केलं आहे. यात केवळ फिटमेंट फॅक्टरच नाही, तर नवी वेतन रचना, वेतन मॅट्रिक्स, भत्ते, पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ आणि सेवा शर्तींमध्ये सुधारणा यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
त्यांच्या मते, मागील वेतन आयोगात सर्व स्तरांसाठी एकच फिटमेंट फॅक्टर लागू केल्यामुळे वेतन रचनेत असमतोल निर्माण झाला. त्यामुळे यावेळी स्तरानुसार वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोणत्या स्तरासाठी किती फिटमेंट फॅक्टर?
एफएनपीओने सुचवलेल्या मॉडेलनुसार –
लेव्हल 1 ते 5 (गट क/ड) : 3.0
लेव्हल 6 ते 12 : 3.05 ते 3.10
लेव्हल 13 ते 15 : 3.05 ते 3.15
लेव्हल 16 व त्यावरील : 3.20 ते 3.25
या पद्धतीमुळे खालच्या आणि मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांना जास्त दिलासा मिळेल, असा दावा संघटनेने केला आहे.
पगारात किती वाढ होऊ शकते?
जर फिटमेंट फॅक्टर 3.25 मंजूर झाला, तर –
लेव्हल 1 चा मूळ पगार सुमारे 58 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो
लेव्हल 10 (ग्रुप A एंट्री) चा पगार 1.8 लाख रुपयांहून अधिक होण्याची शक्यता
लेव्हल 18 (उच्च स्तर) साठी पगार 8 लाखांपेक्षा जास्त जाऊ शकतो
म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांचा पगार दोन ते तीन पट वाढण्याची शक्यता आहे.
5 टक्के वार्षिक वेतनवाढीची मागणी
सध्या लागू असलेली 3 टक्के वार्षिक वेतनवाढ वाढवून 5 टक्के करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पदोन्नतीच्या संधी मर्यादित असलेल्या गट क आणि ड कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ अत्यंत फायदेशीर ठरेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
येत्या 25 फेब्रुवारी 2026 रोजी एनसीजेसीएमची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम शिफारशी 8 व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे देशभरातील कर्मचारी उत्सुकतेने पाहत आहेत.













