Monsoon News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरतोय. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही शिवाय उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होताना दिसते.
आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा अक्षरशः भरडला जातोय आणि कर्जबाजारी होतोय. यावर्षी अर्थातच 2025 मधील मान्सून हंगामात देखील निसर्गाचा असाच लहरीपणा पाहायला मिळाला. मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे कमी प्रमाण राहिले.

पण, मान्सूनच्या उत्तरार्धात राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. कमी कालावधीत जास्त पाऊस पडला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले. 2025 च्या मान्सून कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला पण कमी दिवसात जास्त पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले यामुळे पावसाची सरासरी जास्त वाटत असली तरी सुद्धा याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही उलट यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निघून गेला.
आता शेतकऱ्यांचा आधार रब्बी हंगामावर आहे. दरम्यान शेतकरी बांधव रब्बी हंगामासाठी लगबग करत असतानाचं पुढील मान्सून बाबत म्हणजेच मान्सून 2026 बाबत एक नवा हवामान अंदाज समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये तसेच गाव पातळीवर शेतकऱ्यांमध्ये 2026 मध्ये मोठा दुष्काळ येऊ शकतो अशा काही चर्चा रंगताना दिसत आहेत आणि यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले आहेत. खरच 2026 मध्ये दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. पण आता 2026 च्या मान्सून संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी मोठी माहिती दिली आहे. पुढील वर्षी खरंच महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट राहणार का याबाबत पंजाबरावांनी माहिती दिली आहे.
2026 मध्ये कसा राहणार पावसाळा?
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, 2025 मध्ये जशी अतिवृष्टी झाली तसेच अतिवृष्टी 2026 मध्ये पण होणार अशा काही चर्चा सुरू आहेत पण असे काही घडणार नाही. पुढील वर्षी मान्सून काळात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सरासरी एवढा पाऊस होऊ शकतो. पुढल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी जास्त राहणार नाही. 2026 च्या मान्सूनमध्ये संतुलित स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
ज्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 700 मिमीच्या आसपास पाऊस होतो, तिथे याच प्रमाणात पाऊस पडणार असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या मानसून काळात राज्यात जास्त पाऊस झाला नाही तरी जो पाऊस पडेल तो शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. पावसाचे असमान वितरण झाले नाही, सगळीकडे सरासरीच्या आसपास पाऊस झाला तर शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेता येते आणि पुढल्या वर्षी अशीच स्थिती राहणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
जानेवारीत ढगाळ हवामानाची शक्यता
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामानात काही बदल जाणवण्याची शक्यता आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे 28 डिसेंबर पासून ते 3 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात थंडीचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल.
विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अचानक राज्यात ढगाळ हवामानाची निर्मिती होईल आणि हळूहळू ढगाळ हवामान वाढत जाईल असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र ढगाळ हवामान झाले तरी देखील राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
या ढगाळ हवामानाचा शेती पिकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही उलट हरभऱ्यासारख्या पिकांकरिता हे वातावरण पोषक ठरू शकते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील या हवामानाचा फायदा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.