Maharashtra Ghat : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात हजारो किलोमीटर लांबीची रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरम्यान आता राज्यातील एका महत्त्वाच्या घाट विभागात नवीन मार्ग तयार केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्ध शक्तीपीठ म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेल्या सप्तश्रृंग गडावर हा मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड येथे आई भगवतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे.

खरे तर आजच्या घडीला गडावर ये-जा करण्यासाठी फक्त नांदुरी ते सप्तश्रृंग गड हा एकमेव घाट मार्ग आहे. पण आता याला पर्याय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन स्वतंत्र मार्ग विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्कीच हा मार्ग प्रत्यक्षात आल्यानंतर भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
सध्या नांदुरी ते सप्तश्रृंग गड हा सुमारे १० किलोमीटरचा एकमेव घाट मार्ग उपलब्ध आहे. मात्र, पावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढते. तसेच नवरात्रोत्सव, सलग सुट्ट्या आणि विशेष धार्मिक काळात गडावर प्रचंड वाहनांची गर्दी होत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.
गड परिसरात वाहनतळासाठी जागेची कमतरता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनते. घाट मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्यास वाहन मागे घेणेही अशक्य होते, ज्याचा थेट परिणाम भाविकांच्या सुरक्षिततेवर होतो. गेल्या डिसेंबर महिन्यात याच मार्गावर मोटार दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती.
याआधीही अनेक ठिकाणी अपघात झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत पर्यायी मार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तश्रृंगी गड, नांदुरी, अभोणा, कनाशी, मानूर आणि अलियाबाद या भागांना जोडणाऱ्या नव्या रस्त्याचे संरेखन निश्चित करण्याचे नियोजन केले आहे.
यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या घाट मार्गाचे कॉंक्रिटीकरण, संरक्षक कठडे उभारणी आणि धोकादायक वळणांवरील भिंतींचे मजबुतीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. भाविक आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी दुसरा असा स्वतंत्र मार्ग असावा, अशी गरज निर्माण झाली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर सर्वेक्षण व आवश्यक भू संपादन प्रस्ताव तयार करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतून एक कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होताच सर्वेक्षणाच्या कामाला वेग येणार असल्याचे सहायक अभियंता रोहिणी वसावे यांनी सांगितले. या नव्या मार्गामुळे आई भगवतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी अडचण दूर होणार आहे. सध्याचा घाट मार्ग पावसाळ्यात अधिक रिस्की बनतो यामुळे नवीन मार्गाची गरज जाणवत होती. यानुसार आता नवा मार्ग बनवला जाणार आहे.












