Marathi News : थायलंड येथील एका उद्यानात शास्त्रज्ञांना विंचवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. या विंचवाला आठ डोळे आणि आठ पाय आहेत. ज्यामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यापूर्वी अशा प्रकारचा विंचू कधीच पाहिला नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या नावावरून शास्त्रज्ञांनी त्याचे नाव ‘यूस्कॉर्पियोप्स क्रचान’ असे ठेवले आहे.
जगभरात हजारो आणि लाखो प्रजातींचे प्राणी आढळतात, यातील अनेक प्रजाती तुम्हाला माहीत असतील तर अन्य अनेक प्राण्यांची नावे तुम्हाला माहितीही नसतील. मात्र काही वेळा शास्त्रज्ञांना असे प्राणी आश्चर्यचकित करतात.
अशाच प्रकारचा विचित्र प्राणी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तुम्ही शेतात, मैदानावर किंवा घरामध्ये विंचू पाहिला असेल, मात्र आठ डोळे आणि आठ पाय असलेला विंचू कधी पाहिला आहे का? खरं तर, संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे की,
त्यांना थायलंडच्या फेचबुरी प्रांतातील काएंग क्राचन नॅशनल पार्कमध्ये विंचूची एक नवीन प्रजाती सापडली आहे, ज्याला दोन नाही तर आठ डोळे आणि आठ पाय आहेत. खडकाच्या खाली लपलेल्या तीन नर आणि एका मादी विंचूच्या नमुन्यांच्या आधारे या नवीन प्रजातीचे वर्णन करण्यात आले आहे.
जरी त्यांचे डोळे आणि पाय जास्त असले तरी ते सामान्य विंचूपेक्षा लहान असतात. विंचूची ही नवीन प्रजाती यूस्कॉर्पियोप्स या उपजिनसमध्ये ठेवण्यात आली आहे आणि थायलंडमधील राष्ट्रीय उद्यानाच्या नावावरून शास्त्रज्ञांनी तिचे नाव यूस्कॉर्पियोप्स क्रचान असे ठेवले आहे.
शास्त्रज्ञ केंग क्रचान नॅशनल पार्कमध्ये वन्यजीव शोधत होते, त्याचदरम्यान त्यांना खडकाच्या खाली लपलेला एक विचित्र तपकिरी आणि केसाळ प्राणी दिसला. या विंचूंचा रंग तंतोतंत खडकाच्या रंगासारखाच होता, त्यामुळे पहिल्या दृष्टीक्षेपात खडक आणि विंचू यांच्यातील फरक ओळखणे कठीण होते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
त्या विंचूंना पाहिल्यानंतर सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटले की, कोणीतरी प्राणी भक्ष्याच्या शोधात जात आहे, पण जेव्हा त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना समजले की, ती एक मादी विंचू आहे, जी आपल्या चार पिल्ल्यांना पाठीवर घेऊन जात होती.
संशोधकांनी सांगितले की, विंचूची ही नवीन प्रजाती एक इंच लांब आहे आणि त्यांच्या शरीरावर केसदेखील आहेत, परंतु त्यांच्यातील सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आठ डोळे आणि आठ पाय आहेत. यासंबंधीचा अहवाल नुकताच ‘जूटाक्सा जर्नल’ मध्ये प्रकाशित झाला आहे.