Aadhar Card News : देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र ठरले आहे. शासकीय योजना, बँकिंग सेवा, सिम कार्ड खरेदी अशा जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
मात्र, अनेकदा आपल्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे तातडीची कामे अडकतात. यावर उपाय म्हणून UIDAI ने एक नवी सुविधा सुरू केली आहे. आता नागरिकांना थेट WhatsApp वरून आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे.

या सेवेसाठी सरकारने MyGov Helpdesk हा अधिकृत WhatsApp नंबर +91-9013151515 उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून “Hi” असा संदेश पाठवायचा आहे.
त्यानंतर चॅटबॉट विविध सेवा पर्याय देईल. यामध्ये “DigiLocker” सेवा निवडल्यास आधार डाउनलोड करता येईल. मात्र, या प्रक्रियेसाठी नागरिकांचे DigiLocker मध्ये खाते असणे बंधनकारक आहे.
खाते तयार केले असल्यास, वापरकर्त्याला आपला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर पडताळणी पूर्ण होईल आणि DigiLocker मध्ये उपलब्ध कागदपत्रांची यादी दाखवली जाईल.
यातून आधार निवडल्यावर काही क्षणांतच WhatsApp वर ई-आधार मिळेल. यापूर्वी आधार कार्ड मिळवण्यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाईट किंवा mAadhaar अॅप असे पर्याय होते.
आता WhatsApp हा नवा आणि सोपा पर्याय नागरिकांना मिळाला आहे. त्यामुळे आधार कार्डची गरज भासली, तरी तुम्हाला ते सोबत बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. काही क्लिकमध्ये कुठूनही आधार डाउनलोड करून महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील.
ही सुविधा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी आधार कार्ड वापरणे अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. या नव्या सोयीमुळे आधार कार्ड खिशात नसले तरीदेखील नागरिकांना कुठेही प्रवास करता येऊ शकतो.
शासकीय आणि निम शासकीय कामांमध्ये आधार कार्ड ची गरज पडते. त्यामुळे जर तुम्ही बाहेर असाल आणि आधार कार्डची गरज पडली तर ही सुविधा तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.