Aadhar Card:- आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज असून आज ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. परंतु प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जर ओळखपत्र द्यायचे असेल तरी देखील आधार कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्ड हे व्यक्तीच्या ओळखीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे दस्तऐवज आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये बनावट आधार कार्डचा वापर करून फसवणुकीच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे बनावट आधार कार्ड देखील वापरले जाऊ शकते ही गोष्ट जवळपास सिद्ध झालेली आहे. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण एखाद्याला घर भाड्याने देतो तेव्हा भाडेकर कडून त्याचे आधार कार्ड घेत असतो. अशावेळी तुम्ही संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड खरे आहे की बनावट हे तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग या लेखात आपण बघू की आधार कार्डशी संबंधित फसवणूक टाळण्यासाठी त्याची सत्यता कशा पद्धतीने पडताळता येईल.
आधार कार्ड खरे की बनावट कसे तपासाल?
1-UADAI वेबसाईटचा वापर करून- तुम्हाला जर आधार कार्डची सत्यता पडताळणी करायची असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे व त्या ठिकाणी भाषेची निवड करावी. नंतर त्या ठिकाणी असलेल्या माय आधार विभागातील आधार सेवा या विभागात जावे व आधार क्रमांक व्हेरिफाय करा यावर क्लिक करावे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडते व त्या ठिकाणी तुम्हाला पडताळायचा असलेला आधार नंबर टाकावा व त्या ठिकाणी असलेला सिक्युरिटी कोड नमूद करावा व व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही जो काही बारा अंकांचा आधार क्रमांक टाकलेला आहे आणि तो डीऍक्टिव्हेट केलेला नसेल तर तो आधार क्रमांक उपस्थित आहे व कार्यरत आहे यासंबंधीची स्थिती त्या वेबसाईटवर दाखवली जाते. अशाप्रकारे जर माहिती दाखवली तर समजून घ्यावे की आधार क्रमांक बनावट नसून खरा आहे.

2-mAdhaar ॲपचा वापर करून- या व्यतिरिक्त तुम्ही एम आधार ॲपचा वापर करून देखील आधार कार्डची पडताळणी करू शकतात. याकरिता आधार कार्डमध्ये क्यूआर कोड दिलेला असतो व त्याचा वापर तुम्ही व्हेरिफिकेशन साठी करू शकतात. यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही एम आधार एप्लीकेशन डाउनलोड करावे व हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करिता असलेले दोन पर्याय त्या ठिकाणी दिसतात. यातील आधार व्हेरिफाय या पहिल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करून आधार क्रमांक टाकून त्या क्रमांकाचे वेरिफिकेशन करू शकतात. तसेच दुसरा पर्याय जर बघितला तर यामध्ये क्यूआर कोड स्कॅनरमध्ये आधार कार्ड वरील क्यूआर कोड स्कॅन करून आधार क्रमांक खरा आहे की खोटा आहे हे तपासू शकतात. तसेच आधार क्यूआर स्कॅनर ॲप्स वापर करून तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून आधारची योग्य माहिती मिळवू शकतात.