Aamdar Nilesh Lanke News : काल अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे काल लंके यांनी पुण्यात शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत ‘मी अनुभवलेला कोविड’ या लंके यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याचं पत्रकार परिषदेत लंके शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशी बातमी व्हायरल झाली होती.

लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तशीच माहिती दिली जात होती. त्यामुळे शरद पवार आणि निलेश लंके यांनी अजित दादा यांच्या गटाला कात्रजचा घाट दाखवला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला आल्या. पण, ऐनवेळी सारच बिघडलं.
काल लंके यांच्या पुस्तकाचे प्रकाशन तर झाले मात्र त्यांचा शरद पवार गटात प्रवेश करण्याचा इरादा कालही अपूर्णच राहिला. पण, लंके यांची शरद पवार यांच्या गटात जाण्याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असल्याचा चर्चा आहेत.
अशातच, आता अजितदादा यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश लंके यांना टोला लगावला आहे. खरेतर आमदार लंके शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात फिरत आहेत.
लंके यांच्या राजकीय हालचाली देखील तसेच संकेत देत आहेत. पण याला योग्य मुहूर्त मिळत नाहीये. यासाठी कालचा मुहूर्त हा ठरलेला होता. मात्र मुहूर्ताच्यावेळी राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी डाव पालटला. काल लंके यांचा पक्षप्रवेश झाला नाही.
मात्र, यावेळी लंके यांनी साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे सुतोवाच करून पक्षप्रवेशाच्या चर्चा अजून जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे पवार साहेबांनी देखील लंके यांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.
परंतु शरद पवार आणि निलेश लंके या दोन्ही नेत्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केलेली नाही. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमके काय सुरू आहे हे समजायला मार्ग नाही. मात्र लंके यांच्या या हालचालींमुळे अजितदादा यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील महायुतीचा धर्म पाळणार आणि भाजपाच्या उमेदवाराला साथ देणार, भाजपाच्या उमेदवारासाठी काम करणार असे म्हणत लंके यांच्या अजितदादा गटाकडे परण्याचा मार्ग बंद केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी देखील निलेश लंके यांना टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी म्हणतात….
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक ट्विट केले आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘गेल्या 8 महिन्यात पारनेर विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी ६३७ कोटी रुपये आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक हजार कोटी रुपये अजितदादांकडून घेऊन गेलेले आमदार नीलेश लंके साहेबांचा तुतारी गटाने करेक्ट कार्यक्रम केला आहे’, असे म्हणतं खोचक टोला लगावला आहे. एवढेच नाही तर मिटकरी यांनी आपल्या या पोस्ट खाली ‘दिल्या खरी सुखी राहा’ या हॅशटॅगचा देखील वापर केला आहे.