Aayushman Card News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अशीच एक महत्त्वाची योजना आहे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत.
दरम्यान, आज आपण याच योजनेच्या बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्य क्षेत्रातील वाढता खर्च अनेक कुटुंबांच्या अर्थकारणावर मोठा ताण टाकत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अचानक उद्भवणारे वैद्यकीय बिल हा मोठा डोकेदुखीचा विषय बनतो.

अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat – PMJAY) राबवून मोठा आधार उपलब्ध करून दिला आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते.
महत्त्वाचे म्हणजे, ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांचाही या योजनेत अलीकडेच समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे वृद्ध नागरिकांनाही आर्थिक चिंतेशिवाय आवश्यक उपचार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयुष्यमान कार्डावरील ५ लाख रुपयांची मर्यादा ही एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी असते. उदाहरणार्थ, कुटुंबात चार सदस्य असतील, तर सर्वांसाठी मिळून एकूण ५ लाखांचे कवच लागू होते.
कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आवश्यकतेनुसार उपचार करता येतात आणि जोपर्यंत ही मर्यादा संपत नाही, तोपर्यंत रुग्णालयात कितीही वेळा उपचार घेता येतात.
एका वर्षात कितीदा उपचार घेता येतात ?
या योजनेत उपचारांच्या संख्येवर कुठलीही मर्यादा नाही. मर्यादा फक्त ५ लाख रुपयांच्या कवचाची आहे. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्या वर्षात मोफत उपचार थांबतात. पुढील वर्षी कवच पुन्हा रीसेट होते.
पात्रता तपासण्याची सोपी प्रक्रिया
नागरिक https://pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Am I Eligible’ या पर्यायाद्वारे आपले नाव योजनेत समाविष्ट आहे की नाही हे तपासू शकतात.
राज्यनिहाय दिलेल्या पर्यायांनुसार रेशन कार्ड, मोबाईल नंबर किंवा कुटुंब सदस्यांची माहिती भरून पात्रता तपासता येते. तसेच जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनही पडताळणी करता येते.
आयुष्यमान कार्ड कसे बनवणार?
पात्र नागरिक ऑनलाईन वेबसाइट किंवा ‘आयुष्यमान भारत’ ॲपद्वारे कार्ड तयार करू शकतात. ऑफलाईन पद्धतीसाठी सीएससी किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी लागते.













