Adani Group Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात घसरण दिसली. विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात माघार घेतली जात असल्याने आणि ट्रेड वॉरच्या भीतीने बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले.
आज व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला. याआधी मंगळवारी सेन्सेक्स 1200 हून अधिक अंकांनी घसरला होता. दरम्यान, शेअर बाजारात जी घसरण सुरू आहे त्यामुळे बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
![Adani Group Stock](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Adani-Group-Stock.jpeg)
सिमेंट कंपनी संघी इंडस्ट्रीज लिमिटेडचाही त्यात समावेश होत आहे. अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्सने आज 52 आठवड्यांचा नवा नीचांक गाठला. कंपनीचे शेअर्स आज 3% घसरून 54.05 रुपयांवर आलेत.
कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत
खरे तर, शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी अलीकडेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. अदानी समूहाच्या मालकीची कंपनी संघी इंडस्ट्रीज लिमिटेडने सुद्धा डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर या कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.
सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडचा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत निव्वळ तोटा रु. 96.96 कोटी होता, जो मागील वर्षी याच तिमाहीत रु. 201.55 कोटी होता. विक्री 36.94% ने वाढून रु. 258.96 कोटी इतकी झाली. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 37% वाढून रु. 259 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 189 कोटी होता.
स्टॉकची शेअर बाजारातील स्थिती कशी आहे?
कंपनीचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 10% आणि एका वर्षात 50% ने घसरले आहेत. गेल्या पाच दिवसांत हे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरलेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 118.20 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 54.05 रुपये आहे.
त्याचे मार्केट कॅप 1,446.63 कोटी रुपये आहे. अंबुजा सिमेंटकडे संघी इंडस्ट्रीजच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलापैकी 58.08 टक्के हिस्सा आहे. डिसेंबर 2023 मध्ये कंपनी ताब्यात घेतली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, अदानी समूहाने संघी इंडस्ट्रीज आणि पेन्ना सिमेंट यांचे अंबुजा सिमेंटमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे त्यांचे सिमेंट ऑपरेशन्स एकाच युनिट अंतर्गत एकत्रित केले जातील.