Agri News : राज्यात शेती सोबतच पशुपालन हा एक महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनातून राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. राज्यात पशुपालनाचा व्यवसाय आधीपासूनच लोकप्रिय राहिला आहे.
दरम्यान पशुपालन व्यवसायाला शासनाकडूनही प्रोत्साहन मिळते. पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना एका महत्वपूर्ण योजनेतून दुधाळ गाई म्हशी खरेदी करण्यासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान मिळते.

राज्य शासन मराठवाडा – विदर्भ दुग्धविकास प्रकल्प राबवत असून याच प्रकल्पाचा टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील पशुपालकांना दूध देणाऱ्या गाई म्हशी खरेदीसाठी तसेच पशुखाद्य, चारा, पशुपालनासाठी आवश्यक विविध यंत्रांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान आता आपण या प्रकल्प अंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टींसाठी किती अनुदान मिळते आणि यासाठी अर्ज कसा करावा लागणार या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेतून किती अनुदान मिळणार ?
या प्रकल्पांतर्गत मराठवाडा विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील पशुपालकांना अनुदान मिळणार आहे. दरम्यान या योजनेबाबत अलीकडेच एक महत्त्वाची बैठक झाली ज्यामध्ये या चारही जिल्ह्यांमधील संबंधित विभागात कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकारी सामील झालेत.
यावेळी या संबंधित मान्यवरांच्या हस्ते एका महत्त्वाच्या QR कोडचे उद्घाटन करण्यात आले. पशुपालक शेतकऱ्यांसाठी जारी झालेला हा क्यूआर कोड स्कॅन करून शेतकऱ्यांना विविध बाबींची माहिती उपलब्ध होते.
योजनेचे सर्व घटक, पात्रता, अनुदान प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवड निकष, ऑनलाइन अर्ज लिंक याची माहिती थेट मोबाइलवर या QR कोडच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दुधाळ गाई म्हशी खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळते.
तसेच उच्च दूध उत्पादनक्षमता असणाऱ्या सात महिन्यांपर्यंतची गाभण कालवड खरेदी करण्यासाठी या योजनेतून 75 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. पशुखाद्य व एफएटी-एसएनएफ वाढवणारे खाद्य खरेदीसाठी सुद्धा 25 टक्के अनुदान मिळते. चारा पिकाचे बियाणे 100% अनुदानावर मिळते.
इलेक्ट्रिक कडबा कुट्टी यंत्र तसेच मुरघास साठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद या योजनेत आहे. पशुपालन व्यवसाय करणाऱ्या जवळपास 35 ते 36000 शेतकऱ्यांना या प्रकल्प अंतर्गत आधुनिक प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दरम्यान या योजनेसाठी पशुपालकांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज हा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर करावा लागणार आहे. www.vmddp.com ही या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.













