शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता पीक कर्जासाठी घरबसल्या अर्ज करता येणार, दोन दिवसात खात्यात जमा होणार कर्जाची रक्कम, पहा…

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून क्रॉप लोन म्हणजेच पीक कर्ज दिले जाते.

जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना क्रॉप लोन उपलब्ध करून देत आहेत. मात्र क्रॉप लोन साठी अर्ज करताना शेतकऱ्यांना मोठे डॉक्युमेंटेशन करावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो वेगवेगळी कागदपत्रे उपलब्ध करावी लागतात.

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि द्रव्य दोघेही खर्ची होतात. पण आता यावर एक तोडगा समोर आला आहे तो म्हणजे आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे.

राज्यातील शेतकरी बांधवांना घरबसल्या क्रॉप लोन साठी अर्ज करू शकतील. यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की क्रॉप लोन साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती आणि याच मार्गदर्शक तत्त्वानुसार आता जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

www.jansamarth.in या पोर्टल वर जाऊन राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी थेट घरबसल्या अर्ज करता येणार आहे. शेतकरी शेताच्या बांधावर बसून या संकेतस्थळावरून पीक कर्जासाठी अर्ज करू शकतील आणि अर्ज केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित राहील तर फक्त दोन दिवसात कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये वर्ग होणार अशी सुद्धा माहिती दिली जात आहे.

पण घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करण्याच्या या सुविधेबाबतचा हा प्रोजेक्ट सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबवला जातोय. ही योजना सध्या पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबवली जात असून, यासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे. या नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज या पोर्टलवरून मिळू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) असणे अनिवार्य असून, आधारकार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि पॅनकार्ड (असल्यास) आवश्यक कागदपत्रे म्हणून ग्राह्य धरली

जाणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, जनसमर्थ पोर्टलमुळे कर्जप्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार आहे. विनाकारण कर्ज अर्ज नाकारले जाणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना कमीत कमी कालावधीत कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल.

विशेष म्हणजे, या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे वेळापत्रक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या तालुका प्रतिनिधी यांच्या समन्वयाने तयार करण्यात येणार आहे.

तसेच, शेतकऱ्यांना अर्ज करताना मदत मिळावी यासाठी सेतू केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे आणि ग्राहक सेवा केंद्रांचा सहभाग घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,

जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास भविष्यात राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ती राबवली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.