Ahilyanagar News : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची उत्सुकता होती त्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात देखील महायुतीचे पारडे जड आहे.
खरंतर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्यात, यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असे वाटत होते.
पण, महायुतीने अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार कमबॅक केले असून 2019 च्या विधानसभा निवडणुकांची आणि लोकसभा निवडणुकांची संपूर्ण कसर भरून काढली आहे. जिल्ह्यातील राहुरी आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून आता जिल्ह्यातून सासरे आणि जावई दोघेही विधानसभेत जाणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप तर राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत. खरेतर, संग्राम जगताप हे शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत. अर्थातच जिल्ह्यातून जावई आणि सासरे दोघेही विधानसभेवर जाणार आहेत.
यामुळे सध्या राहुरी-नगर-पाथर्डी आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या या निकालाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज मतमोजणी सुरू झाली आणि मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच नगर शहर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे आघाडीवर होते.
पहिल्या फेरीपासून जगतापांनी आघाडी घेतली ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि विक्रमी मतांनी त्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. संग्राम भैय्या जगताप यांनी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचा पराभव केला आहे.
तर दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या सात ते आठ फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. मात्र, पंधराव्या फेरीअखेरीस शिवाजीराव कर्डिले यांनी आपले प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना मागे टाकून आघाडी घेतली.
अद्यापही मतमोजणी सुरु असून 22 व्या फेरीअखेरीस शिवाजीराव कर्डिले हे 34 हजार 745 मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांना 100114 मते मिळाली आहेत. कर्डिले यांना 1 लाख 34 हजार मते मिळाली आहेत.