Ahilyanagar News : मध्य महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या महामार्ग प्रकल्पासाठी शासनाकडून 980 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा असा कोपरगाव – मालेगाव महामार्गाच्या चार पदरी कॉंक्रिटीकरणासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी नीधी मंजूर केला असल्याने आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मालेगाव व आजूबाजूच्या परिसरातील जनतेला कोपरगाव – येवला – मनमाड – मालेगाव रस्ता फारच महत्त्वाचा ठरतो.

मात्र, या रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता हा रस्ता चार पदरी व्हावा आणि रस्ता पूर्णपणे काँक्रिटीकरणाचा व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पत्रव्यवहार केला होता आणि याच पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर आता शासनाच्या माध्यमातून या रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आता या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जातोय.
महत्त्वाची बाब म्हणजे या महामार्गाचे काम करताना मंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात उड्डाणपूल व बाह्य वळण रस्त्याचा समावेश करावा अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली असल्याची माहिती समोर येत आहे. खरे तर हा महामार्ग फक्त दोन जिल्हे जोडतो असे नाही तर दोन विभाग जोडतो.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणारा हा महामार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार उत्तर महाराष्ट्र सोबत कनेक्ट करणारा हा महामार्ग आता चार पदरी काँक्रीटचा केला जाणार आहे. या महामार्गाच्या लांबी बाबत बोलायचं झालं तर कोपरगाव ते मालेगाव हे 76 किलोमीटरचे अंतर आहे आणि आता या अंतराच्या कामासाठी सरकारकडून 980 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगाव ते मालेगाव हा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे मालेगाव मधून साईनगरी शिर्डी ला जाणाऱ्या भाविकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. मालेगावातील जनता याच मार्गाने शिर्डीत जाते यामुळे नक्कीच या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास या जनतेला देखील मोठा फायदा होणार आहे.













