अहिल्यानगरसाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील ‘या’ भागात तयार होणार ? बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यालाही फायदा

महाराष्ट्र राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. या मंजूर झालेल्या महाविद्यालयासाठी आता जागेचा शोध घेतला जातोय.  

Published on -

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यासाठी मंजूर झालेले हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर जागेचा शोध घेतला जात आहे. असे असतांना आता याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

कर्जत जामखेड मध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे 

दरम्यान, अहिल्या नगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले पाहिजे अशी आग्रही मागणी पुढे येत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आमदार पवार यांनी काल मंगळवारी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांची भेट सुद्धा घेतली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांनी त्यांना निवेदन दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर आज बुधवारी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजधानी मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. तसेच हे महाविद्यालय कर्जत-जामखेडमध्येच व्हावे, अशी आग्रही मागणी उपस्थित केली. 

कर्जत जामखेड मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची गरज 

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अहिल्यानगर शहर परिसरात आधीच वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व खासगी हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.

त्यामुळे अहिल्यानगरला मंजूर झालेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा शहराजवळच झाले तर जिल्ह्यातील इतर भागांमधील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी थेट जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागणार आहे. यामुळे नव्याने मंजूर करण्यात आलेले हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहर ऐवजी दुसरीकडे तयार करणे अधिक उपयुक्त आहे.

दरम्यान आता नव्या महाविद्यालयासाठी कर्जत-जामखेड हा अधिक उपयुक्त पर्याय ठरेल, असा आशावाद रोहित पवार यांनी व्यक्त केला असून या संदर्भात त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

महत्वाची बाब म्हणजे नव्याने मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय कर्जत जामखेड मध्ये विकसित झाले तर याचा फायदा नगर जिल्ह्याला तर होणारच आहे शिवाय यामुळे बीड, सोलापूर, पुणे, धाराशिव जिल्ह्यातील सीमेवरच्या गावांनाही मोठा लाभ मिळणार आहे.

यासंबंधीत जिल्ह्यांमधील नागरिकांनाही या नव्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगले उपचार उपलब्ध होतील. आमदार रोहित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान आमदार पवार यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

आमदार रोहित पवार यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान येत्या 31 मे रोजी म्हणजे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या दिवशी याची घोषणा व्हावी, अशी विनंती सुद्धा केली आहे. यामुळे आता आमदार रोहित पवार यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक निर्णय घेणार का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe