अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ बाजारात कांद्याचे दर वाढलेत, नवीन कांद्याला काय भाव मिळाला?

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उप बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा उत्पादकांना अगदीच रद्दीच्या भावात कांदा विकावा लागला होता.

Published on -

Ahilyanagar Onion Rate : कांदा हे अहिल्यानगर, नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारी एक प्रमुख नगदी पीक आहे. अहिल्यानगर मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान अहिल्यानगर मधूनच कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आता येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उप बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा उत्पादकांना अगदीच रद्दीच्या भावात कांदा विकावा लागला होता. शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल या दरात कांद्याची विक्री करावी लागली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक कर्जबाजारी झालेत.

पण आता परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बाजारभावात चांगली सुधारणा झाली आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात घोडेगाव उपबाजारात कांद्याला कमाल पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.

घोडेगाव उप बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 19 ऑक्टोबर, शनिवारी झालेल्या लिलावात या बाजार समितीत एकूण २१ हजार ४३१ कांदा गोण्यांची आवक झाली होती.

कालच्या लिलावात एक दोन लॉट हा विक्रमी भावात विकला गेला. या काही मोजक्या मालाला प्रतिक्विंटल पाच हजार रुपयाचा भाव मिळाला. तसेच, मोठा कांदा ४,१०० ते ४,७००, मुक्कल भारी ४,००० ते ४,३००, गोल्टी कांदा ४,००० ते ४,२००, जोड कांदा १,५०० ते ३,५०० रुपये या दरात विकला गेला.

कालच्या लिलावात या उपबाजारात नवीन लाल वाळलेल्या सुक्या कांद्याला चार हजार पाचशे रुपयाचा भाव मिळाला आहे. तसेच, सरासरी तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये या घरात नवीन लाल कांद्याची विक्री झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कालच्या लिलावात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. प्रतिक्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा झाली आहे.

ऐन दिवाळीच्या आधीच बाजारभावात सुधारणा झाली असल्याने या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत नाही तोपर्यंत बाजारभाव असेच तेजीत राहतील अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe