अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंपाची शक्यता ; बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला, दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय?

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी आज राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वतः सत्यजित तांबे यांनी याबाबत माहिती दिली. फडणवीस यांच्या भेटीचा एक फोटो सत्यजित तांबे यांनी आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते.

मात्र त्यांना अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले आहे. थोरात यांनी तब्बल आठ टर्म म्हणजे 40 वर्ष संगमनेरचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्यांना खताळ या नवख्या तरुणाने गुगली टाकून क्लीन बोल्ड केले.

पण खताळ यांच्या गुगली पेक्षा विखे पाटील घराण्याच्या फिल्डिंगमुळेच थोरात बाद झालेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी आज राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

स्वतः सत्यजित तांबे यांनी याबाबत माहिती दिली. फडणवीस यांच्या भेटीचा एक फोटो सत्यजित तांबे यांनी आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. समाज माध्यमांवर हा फोटो झळकल्यानंतर अहिल्या नगरच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नगरच्या राजकारणात आगामी काळात मोठा भूकंप होणार की काय अशा चर्चांना आता ऊत आला आहे. तांबे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले असल्याचे म्हटले आहे.

मात्र तांबे यांच्या या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष लढवली होती. तेव्हापासून सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे हे काँग्रेस पासून लांब आहेत.

नाशिक पदवीधर निवडणूकीच्या आधी तांबे यांचे काँग्रेस सोबत थोडेसे बिनसले होते. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार, अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो असे म्हणत त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

त्यावेळी सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या केमिस्ट्रीची मोठी चर्चा झाली. त्यावेळी तांबे हे भारतीय जनता पक्षात जाणार की काय? अशा चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे हे अपक्ष उभे राहिलेत आणि विजयी झालेत.

या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचाही थोडासा हातभार होता. दरम्यान तांबे यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. तांबे यांनीही फडणवीस हे आपले मोठे भाऊ सारखेचं आहेत असे जाहीरपणे सांगितले आहे.

पण तरीही तांबे यांनी आमच्या घराण्यात काँग्रेसची विचारसरणी असून आपण ही विचारसरणी सोडणार नाही असे म्हणत भाजपापासून आपण वेगळेचं आहोत असे स्पष्ट केले होते. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीनंतर अभिनंदनाचे निमित्त म्हणून तांबे पुन्हा एकदा फडणवीस यांच्या भेटीला गेलेत. यामुळे पुन्हा एकदा नगरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटी मागचे कारण देवाभाऊंचे अभिनंदन करणे हे असले तरी देखील या अभिनंदनाच्या मागेही काही राजकीय पदर असू शकतात असे बोलले जाऊ लागले आहे. या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यात काही मोठा राजकीय भूकंप होणार की काय अशा चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe