Ahmedanagar Name Change : नगर शहराच्या नामांतरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर, शहराच्या नामांतरणाचा मुद्दा हा फार जुना आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून हा मुद्दा नगरच्या राजकारणात चर्चेचा राहिला आहे.
यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील वेळोवेळी नामांतरणाबाबत आश्वासने देण्यात आलीत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान, गेल्या वर्षी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे होणार अशी घोषणा केली होती.
त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी दिली. तसेच याबाबतचा प्रस्ताव दिल्ली दरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगर शहर नामांतरावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यावर आज राज्याच्या महसूल विभागाने याबाबतचे एक महत्त्वाचे राजपत्रक प्रसिद्ध केले आहे.
यानुसार नगर शहर, तालुका व जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून अहमदनगर जिल्हा, शहर व तालुक्याचे नाव अहिल्यानगर झाले आहे.
तसेच उपविभागाचे नाव सुद्धा अहिल्यानगर करण्यात आले आहे. एकंदरीत आता अहमदनगर शहर तालुका आणि जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखला जाणार आहे. सोबतच, उपविभागाचे नाव सुद्धा अहिल्यानगर असे करण्यात आले आहे.