अहमदाबादमधील विमान अपघाताचे सत्य अखेर जगासमोर ! उड्डाणं घेताच दोन्ही इंजिन पडलेत बंद आणि….; अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल काय सांगतो?

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताचे सत्य आता समोर येत आहे. भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने 12 जून रोजी अहमदाबाद येथे घडलेला हा विमान अपघात नेमका का घडला? याबाबतचा अहवाल सादर केला आहे.

Published on -

Air India Plane Crash : 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. हे Air India चे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जात होते. मात्र हे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले आणि या भीषण अपघातात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

खरंतर या विमानात एकूण 242 प्रवासी होते ज्यापैकी 241 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत आणि केवळ एक प्रवासी अपघातातून बचावला आहे. या अपघातात एकूण 260 लोक दगावले आहेत. या विमान अपघातामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली होती आणि आता याच भीषण अपघाताचे सत्य अखेर जगासमोर आले आहे.

हा दुर्दैवी अपघात नेमका का झाला होता? याचा तपास AAIB म्हणजेच भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने पूर्ण केला आहे. तसेच या संस्थेकडून याबाबतचा प्राथमिक अहवाल देखील जारी करण्यात आला आहे. आता आपण AAIB कडून सादर करण्यात आलेला हा प्राथमिक अहवाल नेमका काय सांगतो? याची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

प्राथमिक अहवाल काय सांगतो ?

AAIB ने एकूण पंधरा पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या 15 पानांच्या अहवालामध्ये विमान अपघाताच्या आधी कॉकपिटमध्ये असणाऱ्या दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला? याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे.

AAIB च्या प्राथमिक अहवालात असे सांगितले गेले आहे की एअर इंडियाचे एआय 171 हे विमान 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने रवाना झाले होते. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्याच्या काही सेकंदा नंतर लगेचच इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस Run मोडवरून कटऑफ मोडवर गेले होते.

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच इंजिन 1 आणि इंजिन 2 यांना इंधनपुरवठा करणारे स्विचेस बंद झालेत, यामुळे विमानाचे दोन्हीही इंजिन बंद पडले होते असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे इंधनपुरवठा करणारे स्विचेस रन मोड वरून कट ऑफ मोड वर गेल्यानंतर विमानाच्या कॉकपिटमध्ये असणाऱ्या वैमानिकांमध्ये संवाद सुद्धा झालेला आहे. इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला तू इंधन पुरवठा का बंद केला? असा प्रश्न विचारला यावर उत्तर देताना दुसऱ्या वैमानिकाने मी काहीही केले नाही असे सांगितले.

दरम्यान विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात इंधनपुरवठा बंद झाला, मग ही इंधन कट ऑफची स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यात आली. मात्र तोपर्यंत विमानाची उंची घटलेली होती आणि म्हणूनच विमानाला सुरक्षित पातळी गाठण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

अपघात झालेले हे विमान टेकऑफ आणि क्रॅश दरम्यान जवळपास 30 सेकंद हवेत होते. या अहवालातून असे स्पष्ट होते की सदर विमान हे उड्डाणासाठी योग्य होते, म्हणजे इंधन नियंत्रण समस्या आधी नोंदवली गेली नव्हती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!