Air India Plane Crash : गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे Air India च्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. यात शेकडो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर मग या विमान अपघाताचा विमान अपघात तपास संस्था AAIB कडून युद्ध पातळीवर तपास सुरू झाला आणि आता या तपास संस्थेकडून आपला प्राथमिक तपास अहवाल सादर करण्यात आला आहे.
त्यानुसार, अहमदाबाद विमानतळावरून AI-171 या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात याच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा करणारे स्विच काम करणे बंद झाले होते. त्यानंतर मग कॉकपीट मध्ये असणाऱ्या वैमानिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि ही स्थिती पूर्वपदावर येण्याआधीच विमान कोसळले.

यामुळे विमानात फ्युल स्विच कुठे असतात आणि हे चालू बंद करण्याचा अधिकार कोणाला असतो असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आज आपण याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फ्युल स्विचचे काम काय असते?
अहमदाबाद विमान अपघात विमानाचे फ्युल स्विच रन मोड वरून कट ऑफ मोडवर गेल्यामुळे झाला असा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तेव्हापासून विमानातील फ्युल स्विचबाबत चर्चा सुरू आहेत. जाणकार लोक सांगतात की, विमानातील फ्युल स्विचेसचे काम इंजिनला इंधन पुरवण्याचे असते.
पायलट जमिनीवर विमान सुरू करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी या स्विचेसचा वापर करतात. याशिवाय, उड्डाणादरम्यान जर एखादे इंजिन बंद झाले तर पायलट या स्विचचा वापर करून दुसरे इंजिन सुरू करतात.
हा स्विच अशा प्रकारे बसवला जातो की तो अचानक चालू किंवा बंद करता येत नाही. इतकेच नाही तर इंधन स्विचसाठी वीजपुरवठा देखील वेगळा असतो. जर समजा हे स्विच बंद केले तर इंजिन लगेच बंद होते.
विमानात फ्युल स्विच कुठे असते?
अहमदाबाद विमान अपघातातील विमान बोईंग 787 या प्रकारातील होते. या विमानात दोन इंधन नियंत्रण स्विच असतात जे की थ्रस्ट लेव्हलच्या खाली दिलेले असतात. त्यांना स्प्रिंग्ज बसवले जातात जेणेकरून त्यांची स्थिती अबाधित राहील.
या स्विचसाठी दोन मोड असतात, कटऑफ आणि रन. दरम्यान एअर इंडियाच्या ज्या विमानाचा अपघात झाला त्यावेळी हे स्विच रन मोड वरून कट ऑफ मोडवर आले होते, अशी माहिती प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.
तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही विमानाचे इंजिन बंद किंवा चालू करण्यासाठी, पायलटला प्रथम स्विच वर करावा लागतो. त्यानंतर, मग तो स्विच रनमधून कटऑफ किंवा कटऑफमधून रन मोडवर आणावा लागतो. मात्र उड्डाणादरम्यान हा स्विच बंद करणे खूप धोकादायक असते अशी सुद्धा माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.