केळी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक असून प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाची लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्याला प्रामुख्याने केळीचे आगार असे संबोधले जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वपूर्ण पीक असल्याकारणाने केळीचे उत्पादन आता महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये घेतले जाऊ लागले आहे.
परंतु बऱ्याचदा आपण पाहतो की,गारपीट किंवा वादळी वाऱ्यांमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. प्रामुख्याने बऱ्याचदा केळीची झाडे जमीनदोस्त होतात व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जायला लागते. परंतु आता शेतकऱ्यांच्या या ज्या काही केळी पिकाच्या बद्दल समस्या आहेत त्या बऱ्याच प्रकारे मिटण्यास मदत होणार आहे.

कारण आता आयसीएआरच्या माध्यमातून केळीचे एक प्रभावी वरायटी विकसित करण्यात आली असून तिचे नाव कावेरी वामन असे ठेवण्यात आलेले आहे.
आयसीएआर केळी राष्ट्रीय संशोधन केंद्र तिरुचिरापल्ली यांच्या माध्यमातून ही केळीची व्हरायटी विकसित करण्यात आलेली असून या व्हरायटीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक केळीचे ठेंगणी म्हणजेच बुटकी व्हरायटी आहे.
कावेरी वामन केळीच्या व्हरायटीचे वैशिष्ट्ये
आयसीएआर केळी राष्ट्रीय संशोधन केंद्र तिरुचिरापल्ली यांच्या माध्यमातून केळी पिकाची कावेरी वामन ही बुटकी व्हरायटी विकसित करण्यात आलेली असून ती घरगुती बागेत लावण्याकरिता व व्यावसायिक उत्पादनासाठी देखील फायदेशीर आहे. या व्हरायटीचे केळीचे झाड हे दीडशे ते 160 सेंटीमीटर पर्यंत वाढते.
त्यामुळे कमीत कमी क्षेत्रात देखील जास्त केळीच्या रोपांची लागवड या माध्यमातून शक्य होणार आहे. तसेच प्रत्येक झाडामध्ये आठ ते दहा मध्यम आकाराचे घड तयार होतात व घडांची सेटिंग देखील व्यवस्थित होत असल्याने त्याचे वजन देखील चांगले राहते.
साधारणपणे कावेरी वामन या व्हरायटीच्या केळीच्या एका घडाचे वजन 18 ते 25 किलोपर्यंत असते. उच्च गुणवत्तेच्या लागवडीसाठी ही व्हरायटी योग्य असून कमी क्षेत्रात जास्त रोपांची लागवड करून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही ठेगणी जात असल्यामुळे व तिच्या मजबूत रचनेमुळे ज्या ठिकाणी वाऱ्यांचे प्रमाण जास्त असते त्या ठिकाणी ही जात लागवडीसाठी योग्य आहे. महत्वाचे म्हणजे ही जात ठेंगणी असल्यामुळे हिला आधार देण्याची गरज नसते व त्यामुळे लागवडीचा खर्च दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी व्हायला मदत होते.
तसेच दाट स्वरूपात फळांची लागण झाल्याने उत्पादन देखील चांगले मिळू शकते. व्यावसायिक केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही जात खूप फायद्याची ठरणार
असून विविध प्रकारच्या वातावरणामध्ये अनुकूल आणि इतर हवामानाची जी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते त्याला देखील चांगली प्रतिकारक असल्याने शेतकऱ्यांसाठी नक्कीच कावेरी वामन ही केळीच्या व्हरायटीची लागवड फायद्याचे ठरेल.