जादा पैशांचे आमिष दाखवून शेवगाव तालुक्यातील अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी क्लासिक ब्रिजमनी सोल्युशन या गुंतवणूकदार कंपनीविरोधात शेवगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत ठेवीदारांनी ६ ऑगस्ट रोजी कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दिली. सुमारे १० कोटी रुपयांना कंपनीने फसवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तक्रारीत म्हटले आहे की, क्लासिक ब्रिजमनी सोल्युशन कंपनीत गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्के दराने महिन्याला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
तसे पत्र छापून जाहिरात केली होती. संस्थेचे ऑफिस आखेगाव रोडवरील वरूर चौकात आहे. ठेवीदारांनी ठेवी ठेवल्यानंतर रकमेप्रमाणे शेअर सर्टिफिकेट, नोटरी, दस्त व पैसे भरल्याची पावती दिली जाईल, असे सांगितले.
त्याप्रमाणे ठेवीदारांना नोटरी करून सर्टिफिकेट व रक्कम दिल्याच्या पावत्या देण्यात आल्या. ठेवीदारांना दोन ते तीन महिने परतावाही देण्यात आला. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा ठेवीदारांना देण्यात आला नाही.
ठेवीदारांनी वेळोवेळी शाखेच्या कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता, संस्थेचे कार्यालय बंद होते. तसेच पत्रव्यवहारावर दिलेले संपर्क नंबरही बंद होते. एकदा दोनदा फोन उचलल्यानंतर समोरून उद्धटपणे भाषा वापरण्यात आली.
त्यानंतर अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अधिकारीही उपलब्ध नव्हते. त्यानंतर ठेवीदारांना यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेवगाव पोलिसात तक्रार करण्यात आली.
कंपनीकडून फसवणूक झालेले ठेवीदार नवनाथ हरिचंद्र इसारवाडे, संगीता नवनाथ इसारवाडे, गोरख सीताराम वाघमारे, शैलेश राजेंद्र मेहेर, कानिफ जालिंदर कर्डिले, सचिन भास्कर साळुंखे, संतोष भास्कर साळुंखे, आकाश रमेश कर्डिले, अनिता सुनील बडे, अशोक साहेबराव दारकुंडे, हर्षल नवनाथ काळे, जगन्नाथ अण्णासाहेब निजवे, जिजाबाई कडू रुईकर, कडू हरिभाऊ रुईकर, मीराबाई कानिफनाथ निजवे, प्रकाश पोपटा शिंदे, राजश्री मंगेश देठे, संदीप कडू रुईकर,
राजू तानाजी खंडागळे, सचिन कैलास कुहं, बाबासाहेब नवनाथ कुसळकर, प्रमोद अण्णासाहेब पवार, राघू आप्पासाहेब धोत्रे, अंबिका आप्पासाहेब घोत्रे, गोविंद परसराम साबळे, संभाजी बाबासाहेब कोकाटे, मीनाबाई संभाजी कोकाटे, प्रज्वल संजय कुलकर्णी, प्राजक्ता मनीष देशपांडे, मच्छिंद्र रावसाहेब चव्हाण, संतोष पांडुरंग घनवट, हमीद मसूर पठाण, रावसाहेब सर्जेराव कातकडे, नंदकुमार बाबुराव निजवे.
या ठेवीदारांनी शेवगाव पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील काही मोबाईल नंबर उचलेले गेले नाही तर काही बंद होते.