उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर या ठिकाणी होतेय प्रचंड वाहतूककोंडी अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा

लाँग वीकेंडमुळे १ मे रोजी मुंबईकरांनी पर्यटनस्थळी गर्दी केली. खंडाळा घाटात तब्बल ३ तासांहून अधिक वेळ गाड्या अडकल्या. उन्हाचा त्रास, गाड्यांचे बिघाड, आणि धक्काबुक्की यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Published on -

मुंबई: सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी गावाकडे आणि पर्यटनस्थळांकडे जाण्याचा बेत आखला, पण खंडाळा घाटातील प्रचंड वाहतूक कोंडीने त्यांचा हिरमोड केला. गुरुवारी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आणि त्यानंतरचा शनिवार-रविवार यामुळे चार दिवसांचा लाँग वीकेंड मिळाला.

यामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात पुणे, सातारा, गोवा यांच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नेहमी साधारण एक ते दीड तासात पार होणारा हा घाट गुरुवारी तब्बल तीन तासांहून अधिक वेळ गाड्यांच्या रांगेत अडकला होता.

प्रत्येक सुट्टीत वाहतूक कोंडी

महामार्ग वाहतूक पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले. काही वेळ मुंबईकडे येणारी वाहतूक, तर काही वेळ मुंबईहून बाहेर जाणारी वाहतूक थांबवून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही गाड्या गोगलगायच्या गतीने पुढे सरकत होत्या.

कडाक्याच्या उन्हात आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा प्रचंड त्रास झाला. ठाण्याहून पुण्याकडे निघालेल्या निंबाळकर या प्रवाशाने सोशल मीडियावर या परिस्थितीचा व्हिडीओ शेअर करत सांगितले, “प्रत्येक सुट्टीला असेच होते. वाहतूक पोलिसांनी यासाठी आधीच नियोजन करायला हवे.”

खंडाळा घाटात लांबच लांब रांगा

खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घाटाचा प्रचंड चढ आणि कडाक्याच्या उन्हामुळे अनेक गाड्यांचे इंजिन तापले, क्लच पॅड तुटले, आणि काही गाड्या बंद पडल्या.

लेन बदलण्याच्या प्रयत्नात अनेक गाड्यांना एकमेकांना धडक बसल्याच्या घटनाही घडल्या, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी तातडीने टो गाड्या बोलावून बंद पडलेल्या वाहनांना बाजूला केले, तर काही गाड्या जागेवरच मेकॅनिकच्या मदतीने दुरुस्त करण्यात आल्या.

वाहतुकीचे नियोजन

महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेल्या या लाँग वीकेंडला मुंबईकरांनी मूळ गावं, लोणावळा, खंडाळा, गोवा यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बसेस, खासगी गाड्या आणि ट्रान्सपोर्ट वाहनांचा वापर केला.

पण खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीने त्यांचा प्रवास त्रासदायक ठरला. प्रवाशांचे म्हणणे आहे की, सलग सुट्ट्यांच्या काळात अशी कोंडी नेहमीच होते, त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिक चांगले नियोजन करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News