मुंबईत घरांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबईत घर खरेदी करायचं, हे आता सामान्यांचं काम राहिलेलं नाही. तरीही मुंबईत दरवर्षी काही हजार कोटींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र आता मुंबई शेजारी असणाऱ्या महामुंबईतही जमीन खरेदी-विक्रीने एक नवा उच्चांक केला आहे. अटल सेतू झाल्यानंतर महामुंबईतील जमीनींचे भाव गगनाला भिडले आहेत. बिल्डर लोकांकडून या जमिनींना सोन्याच्या भावात खरेदी करण्याची स्पर्धाच लागली आहे.
वर्षात 407 एकर जमीनीची खरेदी
बांधकाम उद्योगाशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे 2024 मध्ये महामुंबईत गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक जमीनी खरेदीचे व्यवहार झाले. गेल्यावर्षी फक्त 19 व्यवहारांतून 407 एकर जागेची विक्री झाली. हे व्यवहार खालापूर, पनवेल, खोपोली, अलिबाग या परिसरात झाले. यापैकी बहुसंख्य व्यवहारात 50 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जागा घेण्याकडे विकासकांचा कल असल्याचे समोर आले. या जागांमधील सर्वाधीक कमी व्यवहार हा 17 कोटींचा तर सर्वाधिक मोठा व्यवहार 100 कोटी रुपयांना झाला आहे.

काय आहे कारण?
मुंबईतील घरांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे अनेकजण मुंबईबाहेर घर घेण्याचा प्लॅन करताना दिसत आहेत. याशिवाय मुंबईतील वाढलेली गर्दी पाहता अनेकजण महामुंबईत आपले दुसरे घर शोधत आहेत. अशावेळी अनेक विकासक पनवेलपुढील शहरांत मोठे प्रोजेक्ट राबवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे महामुंबईतील जमिनींनादेखील सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळं जागांचे व्यवहार कोट्यवधी रुपयांमध्ये होत आहेत.
‘अटल सेतू’ हेही कारण
मुंबईत काही दिवसांपूर्वी ‘अटल सेतू’ बांधण्यात आला. त्यामुळे नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास सोप्पा झाला. महामुंबईतील पनवेल, अलिबाग सारख्या शहरांना त्यामुळे चांगलीच मागणी आली. सध्या पनवेलमध्ये अनेक बिल्डर्सचे प्रोजेक्ट सुरु झाले आहेत. लवकरच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्या परिसरातही अनेक बिल्डर्स आपले प्रोजेक्ट सुरु करणार आहेत. गेल्यावर्षी ठाण्यातील कळवा येथे एका खासगी कंपनीने साडेचोवीस एकर भूखंड तब्बल 537 कोटी 42 लाख रुपयांना खरेदी केला होता.