Ayushman Bharat Yojana : भारतात वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेचा उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे.
योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. मात्र, आता काही नागरिकांना तब्बल १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळू शकतो.

गेल्या वर्षी सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवत ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला. या निर्णयामुळे ज्या कुटुंबात ७० वर्षांवरील सदस्य आहेत, त्यांना एकूण १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळू शकते. मात्र, हे संरक्षण दोन स्वतंत्र भागांत विभागलेले आहे.
कुटुंबासाठीचे मूळ पाच लाख रुपये पती, पत्नी व मुलांच्या उपचारांसाठी वापरता येतात, तर अतिरिक्त पाच लाख रुपये केवळ ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांसाठी राखीव आहेत. सामान्य कुटुंबीयांनी आपले पाच लाखांचे कवच पूर्ण वापरले असले, तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेले अतिरिक्त कवच इतरांसाठी वापरता येणार नाही.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सदस्यसंख्येवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते.
मात्र, कुटुंबात एकापेक्षा अधिक ७० वर्षांवरील सदस्य असले तरी सर्व ज्येष्ठ नागरिक मिळून त्या अतिरिक्त पाच लाख रुपयांच्या मर्यादेतच कव्हर केले जातात; प्रत्येकाला स्वतंत्र पाच लाखांचे संरक्षण मिळत नाही.
पात्रतेसाठी उत्पन्न, नोकरी किंवा आर्थिक स्थितीची कोणतीही अट नाही. वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे हा एकमेव निकष आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक असून, ई-केवायसीनंतर स्वतंत्र आयुष्मान कार्ड दिले जाते.
‘आयुष्मान’ ॲप किंवा अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करता येते आणि पहिल्याच दिवसापासून उपचारांची सुविधा उपलब्ध होते. कोणताही वेटिंग पीरियड नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना मोठा दिलासा देणारी ठरत आहे.













