Ayushman Card : केंद्र सरकारने सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांना परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. देशभरातील लाखो नागरिक या योजनेचा लाभ घेत असून आयुष्मान कार्ड हे या योजनेचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे अनिवार्य आहे. कार्ड अॅक्टिव्ह असेल, तरच तुम्ही योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकता.

अनेक नागरिकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न असतो की, वर्षभरात किती वेळा उपचार घेता येतात? तर याचे उत्तर म्हणजे, या योजनेत उपचार घेण्यावर कोणतीही मर्यादा (लिमिट) नाही. म्हणजेच, गरज भासल्यास तुम्ही वर्षभरात कितीही वेळा उपचार घेऊ शकता.
महत्त्वाचे म्हणजे, आयुष्मान भारत योजनेत ५ लाख रुपयांची मर्यादा ही संपूर्ण कुटुंबासाठी असते, एखाद्या व्यक्तीसाठी स्वतंत्र नसते. उदाहरणार्थ, कुटुंबात ४ ते ५ सदस्य असतील, तरी सर्व सदस्य मिळून वर्षभरात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात. यामध्ये मोठ्या शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचार, हॉस्पिटलमध्ये भरतीचा खर्च, औषधे आणि तपासण्यांचा समावेश असतो.
या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणे आवश्यक असते. अॅडमिट झाल्यानंतर आयुष्मान कार्ड दाखवले की, पुढील प्रक्रिया सुरू होते. उपचाराचा खर्च थेट सरकारकडून संबंधित हॉस्पिटलला दिला जातो, त्यामुळे रुग्णाला खिशातून पैसे खर्च करावे लागत नाहीत.
आयुष्मान कार्डअंतर्गत सरकारी तसेच खासगी (प्रायव्हेट) रुग्णालयांमध्ये उपचार करता येतात. मात्र, संबंधित हॉस्पिटल हे PMJAY योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
कोणती हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी PMJAY च्या अधिकृत वेबसाइटवर जावे. वेबसाइटवर ‘Find Hospital’ या पर्यायावर क्लिक केल्यास, राज्य, जिल्हा आणि हॉस्पिटलची संपूर्ण यादी पाहता येते.
तसेच, आयुष्मान कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी पूर्ण नसेल, तर कार्ड अॅक्टिव्ह होत नाही आणि उपचारांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पात्र नागरिकांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून आयुष्मान भारत योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.













