2026 मध्ये ‘कॅश क्रॅश’ येणार? बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ

Published on -

Cash Crash Warning : बल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या नेहमीच जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा समर्थकांकडून केला जातो.

सध्या जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, शेअर बाजारातील चढ-उतार आणि सोने-चांदीच्या दरात झालेली अचानक घसरण पाहता, बाबा वेंगा यांनी वर्तवलेला 2026 मधील आर्थिक संकटाचा अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बाबा वेंगा यांनी त्यांच्या एका भविष्यवाणीत जगाला मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या टंचाईचा सामना करावा लागेल, असे म्हटले होते. त्यांच्या मते 2026 या वर्षात ‘कॅश क्रॅश’ होईल, म्हणजेच कागदी चलनाचे मूल्य जवळपास शून्यावर येईल.

अशा परिस्थितीत लोकांकडे असलेले पैसे केवळ कागदाचा तुकडा ठरतील आणि फक्त सोने, चांदी व तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक केलेले लोक सुरक्षित राहतील, असा दावा त्यांनी केला होता.

या भविष्यवाणीनुसार बँकिंग व्यवस्था कोलमडेल आणि कागदी चलनावरचा विश्वास उडेल. परिणामी, लोक मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीकडे वळतील. सध्या डॉलरमधील घसरण, काही देशांतील आर्थिक मंदी आणि जागतिक पातळीवरील राजकीय तणाव पाहता, हा अंदाज खरा ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.80 लाख रुपयांपर्यंत पोहोचले होते, तर चांदीने प्रति किलो 4 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र, 30 जानेवारीपासून बाजारात अचानक मोठी घसरण झाली आणि सलग तीन दिवस सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणुकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या घसरणीमुळे अनेक गुंतवणुकदारांनी आपले ‘व्हर्च्युअल सोने’ विकण्यास सुरुवात केली आहे, तर काही जण किमती कमी झाल्याचा फायदा घेत खरेदीसाठी पुढे येत आहेत. सोशल मीडियावर बाबा वेंगा यांनी भाकीत केलेले आर्थिक संकट 2026 च्या सुरुवातीलाच दिसून येत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्याची जागतिक परिस्थिती, शेअर बाजारातील अस्थिरता आणि मौल्यवान धातूंच्या किमतीतील चढ-उतार हे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीच्या दिशेने संकेत देत आहेत का, हे येणारा काळच सांगेल. मात्र, ही केवळ भविष्यवाणी असल्याने गुंतवणुकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आर्थिक नियोजन करणे अधिक सुरक्षित ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe