Bandhan Bank : देशातील बहुतांश बँका त्यांच्या बचत खात्यांवर किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट घालतात. खात्यात ठराविक रक्कम कायम न ठेवल्यास ग्राहकांकडून दंड आकारला जातो. त्यामुळे अनेक सामान्य ग्राहक, छोटे व्यापारी आणि लहान बचतकर्त्यांवर आर्थिक ताण येतो. मात्र आता खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने (Bandhan Bank) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
बंधन बँकेने त्यांच्या मानक बचत खात्यासाठी (Standard Savings Account) किमान शिल्लक रकमेच्या अटीत मोठा बदल केला आहे. यापूर्वी या खात्यासाठी किमान ५,००० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक होते.

मात्र आता ही मर्यादा कमी करून २,००० रुपये करण्यात आली आहे. बँकेचा हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे बंधन बँकेच्या लाखो खातेदारांना याचा थेट फायदा होणार आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः पगारदार कर्मचारी, लहान व्यवसायिक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना खाते चालवणे अधिक सोपे होईल.
अनेक वेळा खात्यातील शिल्लक किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यामुळे दंड भरावा लागतो. आता किमान शिल्लक कमी झाल्याने दंडाची चिंता कमी होणार असून खाते सक्रिय ठेवणे अधिक सुलभ ठरणार आहे.
कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कमी रक्कम असतानाही खाते सुरळीत वापरता येणार असल्याने डिजिटल व्यवहार, यूपीआय, एटीएम, नेट बँकिंग आणि इतर बँकिंग सेवांचा लाभ घेणे सोपे होईल. परिणामी बँकिंग सेवा अधिक परवडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत.
दरम्यान, देशातील काही बँकांनी आधीच बचत खात्यांवरील किमान शिल्लक अट पूर्णपणे रद्द केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया (BOI), इंडियन बँक आणि कॅनरा बँक यांचा समावेश आहे. बंधन बँकेचा हा निर्णय खासगी बँकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढवणारा आणि ग्राहकहिताचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.













