Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. बँक ग्राहकांसाठी देशातील चार प्रमुख बँकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, आरबीआयने अलीकडेच रेपो रेट मध्ये कपात केली आणि या निर्णयानंतर आता देशभरातील बँकांकडून कर्जाचे व्याजदर कमी केले जात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ५ डिसेंबर रोजी देशातील कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर RBI ने रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात जाहीर केली.

त्यामुळे रेपो दर ५.५० टक्क्यांवरून घसरत थेट ५.२५ टक्क्यांवर आला आहे. रेपो दर घटल्यानंतर देशातील गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या EMI मध्ये थेट घट होणार असल्याने सर्वसामान्य कर्जदारांना आर्थिक सुट मिळणार आहे.
रेपो दर म्हणजे RBI कडून व्यापारी बँकांना देण्यात येणाऱ्या अल्पकालीन कर्जावरील व्याजदर. बँकांकडे चलनविषयक तुटवडा निर्माण झाल्यास त्या सरकारी बाँड्स गहाण ठेवून RBI कडून निधी उभा करतात.
या कर्जावर RBI जे व्याज आकारते त्यालाच रेपो दर असे म्हणतात. रेपो दर वाढल्यास बँकांचे कर्ज महाग होते आणि ग्राहकांवरील EMI वाढते. उलट, रेपो दरात कपात झाल्यास बँकांना स्वस्तात निधी मिळतो आणि ते ग्राहकांपर्यंतही कमी व्याजदराच्या स्वरूपात पोहोचते.
या वर्षात RBI ने रेपो दरात एकूण चार वेळा कपात केली असून फेब्रुवारी ते जून या कालावधीत तीन वेळा घट झाली होती. त्या कालावधीत एकूण एक टक्क्यांची कपात करण्यात आली होती. मात्र ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
डिसेंबर महिन्यातील या ०.२५ टक्क्यांच्या ताज्या कपातीनंतर रेपो दर ५.२५ टक्क्यांच्या पातळीवर स्थिरावला आहे. म्हणजेच संपूर्ण वर्षात १.२५ टक्क्यांची रेपो कपात करण्यात आली आहे. RBI च्या या निर्णयानंतर देशातील चार प्रमुख बँकांनी त्यांच्या कर्ज व्याजदरात कपात जाहीर केली आहे.
सरकारी बँक ऑफ बडोदाने (BoB) बडोदा लिंक्ड लेंडिंग रेट (BRLLR) ८.१५ टक्क्यांवरून कमी करून ७.९० टक्के केला आहे. इंडियन बँकेनेही रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट ८.२० टक्क्यांहून ७.९५ टक्क्यांवर आणला आहे.
बँक ऑफ इंडियाने त्यांच्या रेपो बेस्ड लेंडिंग रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची घट करत तो ८.१० टक्क्यांवर निश्चित केला आहे. तर खासगी क्षेत्रातील करुर वैश्य बँकेने EBR-R मध्ये ०.२५ टक्के कमी करून नवीन दर ८.८० टक्क्यांवरून ८.५५ टक्क्यांवर आणला आहे.
या निर्णयानंतर इतर बँकाही लवकरच व्याजदरात कपात करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी लाखो कर्जदारांच्या EMI मधील घट थेट त्यांच्या मासिक बचतीसाठी लाभदायक ठरणार आहे.













