Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने गेल्या बारा महिन्यांच्या काळात देशभरातील सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआयकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात असते.
आरबीआय काही बँकांवर दंडात्मक कारवाई करत असते तर काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द केले जाते. आरबीआय बँकांचे लायसन्स सहजासहजी रद्द करत नाही, जेव्हा बँकेची आर्थिक स्थिती डगमगते तेव्हाच आरबीआय कडून बँकेचे लायसन्स रद्द केले जाते.

जी बँक आपल्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यात असमर्थ ठरते, बँकेची आर्थिक स्थिती ठेवीदारांचे नुकसान करू शकते असे जेव्हा मध्यवर्ती बँकेला वाटते तेव्हा त्या बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द केला जात असतो. म्हणजेच आरबीआयकडून ग्राहकांचे हित जोपासण्यासाठीच बँकांचे लायसन्स रद्द केले जाते.
तसेच कोणत्याही बँकेचे लायसन रद्द करण्यापूर्वी त्या बँकेला आरबीआयकडून पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सवलत सुद्धा दिली जाते आणि स्वतः आरबीआय देखील ती बँक पुन्हा पूर्वपदावर यावी यासाठी प्रयत्न करते. मात्र संधी देऊन सुद्धा ज्या बँका रिकव्हर होऊ शकत नाहीत, त्या बँकांचे लायसन्स आरबीआयकडून रद्द होते म्हणजेच अशा बँकांना बँकिंग व्यवसाय करता येत नाहीत.
दरम्यान आज आपण गेल्या बारा महिन्यांच्या काळात म्हणजेच जुलै 2024 ते जुलै 2025 या कालावधीत आरबीआयने देशातील किती बँकांचे लायसन्स रद्द केले आहे? या यादीत महाराष्ट्रातील किती बँकांचा समावेश आहे याचा आढावा घेणार आहोत.
12 महिन्यांच्या काळात 12 सहकारी बँकांचे लायसन्स रद्द!
2024 मध्ये लायसन्स रद्द झालेल्या बँका : गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये आरबीआय कडून कर्नाटक राज्यातील हिरियूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, तामिळनाडू राज्यातील श्री महालक्ष्मी मर्केंटाइल को ऑपरेटिव्ह बँक, बिहार मधील जय प्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, राजस्थान मधील सुमेरपूर मर्केंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, उत्तर प्रदेश राज्यातील पूर्वांचल सहकारी बँक गाजीपुर, आपल्या महाराष्ट्रातील सिटी को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई, उत्तर प्रदेश राज्यातील बनारस मर्केंटाइल सहकारी बँक वाराणसी या 7 बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले होते.
2025 मध्ये लायसन रद्द झालेल्या बँका : 2025 च्या सुरुवातीला आरबीआय ने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये छत्रपती संभाजी नगर येथील अंजना अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, छत्रपती संभाजी नगर या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.
यानंतर गुजरात राज्यातील कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव बँक अहमदाबाद या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाला. एप्रिल महिन्याच्या शेवटी पंजाब राज्यातील इंपीरियल अर्बन को ऑपरेटिव्ह बँक जालंधर या सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला.
यावर्षी महाराष्ट्रातील अंजना अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सोबतच अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा देखील परवाना रद्द झाला. तसेच नुकत्याच तीन दिवसांपूर्वी कारवार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक कारवार या कर्नाटकातील सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे.