Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने देशातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआय कडून देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे तसेच काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयने रद्द केले आहे.
दरम्यान आता कर्नाटकातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय आरबीआय ने घेतला आहे. याबाबतचा आदेश 22 जुलै रोजी निर्गमित झाला असूनच 23 जुलै रोजी बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच आजपासून या बँकेला बँकिंग व्यवसाय करता येणार नाही.

यामुळे सध्या या संबंधित बँकेच्या खातेधारकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत आज आपण आरबीआयने कर्नाटकातील या बँकेचे लायसन्स का रद्द केले आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार, त्यांच्या पैशांचे काय होणार? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
या बँकेचे लायसन्स झाले रद्द
मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने कर्नाटकातील द कारवार अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड या सहकारी बँकेचे लायसन रद्द केले आहे. आरबीआय ने 22 जुलै रोजी याबाबतचा आदेश जारी केला असून रजिस्ट्रार ऑफ को ऑपरेटिव्ह सोसायटीज, कर्नाटक यांना सदर बँकेवर लिक्विडेटर नियुक्त करावा असे निर्देशही दिलेले आहेत.
आरबीआय ने आपल्या आदेशात द कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याचे सांगत ही सहकारी बँक सुरू राहणे ग्राहकांच्या हिताचे नाही असे स्पष्ट केले आहे.
बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता या बँकेला आपल्या ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे देता येणार नाहीयेत. यामुळे बँकेला यापुढं व्यवसाय करु देणं हे सार्वजनिक हितावर वाईट परिणाम करु शकतं, हेच कारण आहे की या सहकारी बँकेचा परवाना आरबीआय कडून रद्द करण्यात आला आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
सदर सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये आणि ठेवीदारांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. पण या बँकेच्या ठेवीदारांना कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणं 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे.
म्हणजे या बँकेत जर एखाद्या ग्राहकाचे पाच लाख रुपये असतील तर त्यांना ती पूर्ण रक्कम परत मिळणार आहे मात्र जर एखाद्या ग्राहकाचे पाच लाखांपेक्षा अधिकचे पैसे असतील तर त्यांना फक्त पाच लाख रुपये मिळणार आहेत, उर्वरित पैसे मिळणार नाहीत. या बँकेच्या ग्राहकांपैकी एकूण 92.90% ठेवीदार संपूर्ण रक्कम मिळवण्यास पात्र राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.