Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आला आहे.
अशातच आता आरबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून देशातील दोन मोठ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने सिटीबँक N.A. आणि IDBI बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला आहे.

आरबीआय कडून याबाबतचे परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांच्या अहवालावर आणि परकीय चलन व्यवहारांवरील प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्याने या कारवाईचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
कोणत्या बँकेकडून किती दंड?
सिटीबँक N.A. वर 36.28 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांनी Liberalised Remittance Scheme अंतर्गत व्यवहार अहवाल देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, IDBI बँकेला 36.30 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. परकीय चलन खात्यातून आलेल्या रकमेच्या व्यवहारांची पुरेशी तपासणी न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 21 मार्च 2025 रोजी अर्थातच शुक्रवारी आरबीआय आणि याबाबतचे अधिकृत निवेदन जारी केले.
बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
RBI ने जारी अधिकृत निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, या दंडात्मक कारवाईमुळे ग्राहकांच्या व्यवहारांवर किंवा त्यांच्यासोबत असलेल्या बँकिंग करारांवर कोणताही परिणाम होणार नाही.
अर्थातच आरबीआयकडून करण्यात आलेली ही दंडात्मक कारवाई फक्त बँकेपुरती मर्यादित आहे. या दंडाची रक्कम देखील फक्त बँकेकडूनच वसूल होणार असून ग्राहकांकडून हे पैसे वसूल केले जाणार नाहीत.
आरबीआयने असे सांगितले आहे की, बँकिंग क्षेत्रात नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी हा दंडात्मक निर्णय घेण्यात आला आहे. RBI च्या तपासणीत सिटीबँकने आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहारांच्या पारदर्शकतेसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
तर, IDBI बँकेच्या परकीय चलन व्यवहारांची निगराणी प्रक्रिया योग्य प्रकारे न झाल्याने वित्तीय नियमांच्या पालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील नियम अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित झाले आहे.
यापुढे अशा त्रुटी होऊ नयेत म्हणून बँकांनी त्यांच्या नियम व अनुपालन प्रणालीत सुधारणा करावी, असा स्पष्ट इशारा RBI ने यावेळी दिला आहे. यामुळे या संबंधित बँकेच्या लोकांचे खाते असेल, जे ठेवीदार असतील त्यांनी काळजी करू नये असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.