Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील तीन बड्या बँकांवर कारवाई केली आहे. खरे तर, गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून देशातील अनेक प्रमुख सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयकडून काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर काही बँकांचे आरबीआयने चक्क लायसन्स सुद्धा रद्द केले आहे.

अशातच आरबीआयकडून देशातील चार प्रमुख सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब अशी की या चार पैकी तीन बँका आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
या चार बँकांवर आरबीआयची दंडात्मक कारवाई
देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शहादा येथील द शहादा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जालना येथील मोतिराम अग्रवाल जालना मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड, मुंबई या सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय धारवाड येथील द गव्हर्मेंट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी बँकेला देखील आरबीआयने दंड ठोठावला आहे. आता आपण या संबंधित बँकांवर आरबीआयकडून किती दंड आकारला जाईल आणि याचा या संबंधित बँकेच्या ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार ? याची माहिती जाणून घेऊयात.
किती दंड आकारला जाणार ?
आरबीआयने 16 जुलै रोजी द शहादा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मोतिराम अग्रवाल जालना मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी बँकेवर सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई येथील सह्याद्री सहकारी बँक लिमिटेडला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ह्या महाराष्ट्रातील तीन बँकांव्यतिरिक्त धारवाड येथील द गव्हर्मेंट एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, धारवाड या सहकारी बँकेला एक लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
आरबीआयने देशातील चार सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात आपल्या महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांचा समावेश आहे. मात्र आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर थेट कोणताच परिणाम होणार नाही. आरबीआयने ठोठावलेला हा दंड संबंधित बँकांकडून वसूल केला जाणार आहे.
दंडाची रक्कम ग्राहकांकडून वसूल होणार नाही शिवाय या दंडात्मक कारवाईचा बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाईमुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे सुद्धा आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.